अहमदनगर : महापालिकेत पदे भूषविणाऱ्या महापौर, उपमहापौर, सभापती यांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल तयार झाले असून प्रचारही रंगला आहे. भाजपकडे इच्छुकांचा ओढा जास्त असल्याने अद्याप पॅनल तयार झाला नाही. काँग्रेस व मनसेकडूनही अनेकजण इच्छुक आहेत. माजी उपमहापौर गीतांजली काळे आणि माजी सभापती सुवर्णा जाधव यांच्यात सामना रंगणार आहे.रेल्वे स्टेशन, आगरकर मळा ते केडगावपर्यंत हा प्रभाग पसरला आहे. पूर्वीच्या प्रभाग क्रमांक २७ आणि २८ यांचा मिळून हा प्रभाग तयार झाला आहे. प्रभाग क्रमांक २७ मधून अनिल शिंदे (शिवसेना), सुवर्णा जाधव (मनसे), विजय गव्हाळे व आशा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) असे चौघे निवडून आले होते. प्रभाग क्रमांक २८ मध्ये झालेल्या पथदिवे घोटाळ््याने जुना प्रभाग क्रमांक २८ चांगलाच चर्चेत आला होता. माजी महापौर शीला शिंदे यांचे पती अनिल शिंदे यांनी सव्वा वर्ष सभागृहनेतेपद भूषविले. तर सुवर्णा जाधव यांनीही शिवसेनेच्या मदतीने स्थायी समितीचे सभापतीपद मिळविले होते. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. चारही जागांसाठी इच्छुकांची संख्या असल्याने चांगली लढत पहायला मिळणार आहे.भाजपकडेही इच्छुकांचा ओढा आहे. अद्याप या प्रभागात पॅनल तयार झालेला नाही. माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांचे वास्तव्य असलेला हा प्रभाग आहे. त्यामुळे खा. दिलीप गांधी आणि अभय आगरकर यांच्या सहमतीने उमेदवार निश्चित करावे लागणार आहेत. इच्छुकांची संख्या जास्त असली तरी अद्याप या प्रभागात भाजपचा पॅनल तयार झालेला नाही. या प्रभागातून काहींचे भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच भाजपचा पॅनल समोर येणार आहे. सध्या तरी माजी उपमहापौर गीतांजली काळे या एकट्या मैदानात उतरल्या असून त्यांचा घरोघरी प्रचार सुरू आहे. दरम्यान पक्षाने दिलेल्या जागेवर निवडणूक लढविण्याची काळे यांची तयारी आहे. माजी सभापती सूर्यकांत खैरे यांच्या स्नुषा सुरेखा खैरे याही इच्छुक आहेत़ शिवसेनेचा पॅनल तयार झाला आहे. माजी सभापती सुवर्णा जाधव (ओबीसी महिला), अनिल शिंदे (सर्वसाधारण),विद्या दीपक खैरे (सर्वसाधारण महिला), प्रशांत गायकवाड (अनुसूचित जाती) असा पॅनल प्रचारात उतरला आहे. याशिवाय आणखी काही इच्छुक वाटेवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक विजय गव्हाळे (अनुसूचित जाती), हेमंत थोरात यांच्या पत्नी (ओबीसी महिला), नगरसेविका आशाबाई पवार (सर्वसाधारण महिला), दत्ता पंडितराव खैरे (सर्वसाधारण), निलेश बांगरे इच्छुक आहेत़ मनसेकडून नितीन भुतारे, श्याम वाकचौरे, ज्योती नांगरे, निर्भवने इच्छुक आहेत. काँग्रेसकडून मंगला भुजबळ, सविता कराळे, कांचन मोहिते, शुभम वाघ, संदीप गायकवाड यांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत. याशिवाय गणेश सातपुते, ऋषिकेश आगरकर हेही इच्छुक आहेत.आगरकर मळ््यामध्ये आधीच चांगले रस्ते होते. पाच वर्षात एकही रस्ता झाला नाही. पाच वर्षात फक्त दोन खड्डे बुजविण्याचे काम झाले. अशुद्ध पाण्याचा पुरवठा, अस्वच्छ प्रभागामुळे पाच वर्षात कावीळ, डेंग्यू असे साथीचे आजार प्रभागाला देण्याचे काम झाल्याच्या लोकभावना आहेत. रस्त्यांची वाट लागल्याने आदर्श समजला जाणारा प्रभाग शेवटच्या थराला गेला आहे, अशी टीका या प्रभागातील एका इच्छुकाने केली आहे.एकनाथनगर, सेंट थॉमस कॅथालिक चर्च, आगरकर मळा, खोकरनाला, विशाल कॉलनी, एकता कॉलनी, झेडपी कॉलनी, सागर कॉम्प्लेक्स, जयभीमनगर, संभाजी कॉलनी, शिवनेरी चौक, गौतमनगर, मुन्सीपल शाळा नंबर-४, अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसर, लक्ष्मीकृपा हौसिंग सोसायटी.
प्रभाग १५अ अनुसूचित जातीब नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)क सर्वसाधारण (महिला)ड सर्वसाधारण