अहमदनगर: महापालिका निवडणुकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने स्वबळाचा नारा देत बारा उमेदवारांची यादी जाहीर केल्याने निवडणुकीला रंगत येणार आहे.नगर शहरात रासपची ताकद कमी असली तरी या पक्षाचे उमेदवार मित्र पक्ष असलेल्या भाजपाच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. राज्यात रासप हा भाजपाचा मित्र पक्ष असून, जानकर हे मंत्री आहेत़ नगर महापालिका निवडणुकीत रासपने भाजपाकडे दहा जागांची मागणी केली होती. भाजपाने मात्र ही मागणी मान्य न केल्याने रासपने स्वतंत्ररित्या निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत विविध प्रभागात २५ पेक्षा जास्त उमेदवार देणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी यांनी सांगितले. या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: महादेव जानकर मैदानात उतरणार असल्याने रासप या निवडणुकीत रंगत आणणार हे मात्र खरे. जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. बहुजन समाजातील मते या पक्षाकडे वळू शकतात. प्रत्यक्षात निवडणुकीत रासपचे उमेदवार किती प्रभावी ठरणार हे निकालानंतरच कळेल.
नगर मनपा निवडणूक २०१८ : ‘रासप’मुळे निवडणुकीत रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:59 AM