अहमदनगर: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इच्छुकांच्या बुधवारी (दि. १४) मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखतीच्यावेळी शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी इच्छुकांनी केली आहे़राष्ट्रवादी काँगे्रसचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत पुणे महामार्गावरील राष्ट्रवादी भवन येथे इच्छुकांच्या मुलाखती होेणार आहेत़ मुलाखतींना ११ वाजता सुरुवात होऊन रात्री उशिरापर्यंत इच्छुकांच्या मुलाखती सुरू राहतील. मुलाखतींसाठी आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप आणि माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह १८ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे़ महापालिका निवडणुकीसाठी एकूण १७ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात ४ उमेदवार असणार आहेत़ परंतु, काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास काही प्रभाग राष्ट्रवादीला काँग्रेससाठी सोडावे लागतील़ पण, आघाडीचा निर्णय अद्याप झालेला नाही़ त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादी स्वबळावरच निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे़सर्वच प्रभागांतून राष्ट्रवादीकडे इच्छुक आहेत़ परंतु, काही प्रभागात काँग्रेसला मानणारे मतदार असल्याने राष्ट्रवादीचीही अडचण होईल़ पण, सध्या सर्वच प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असून, मुलाखतीच्या वेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत इच्छुक आहेत.पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थित बुधवारी मुंबई येथे बैठक होत आहे़ या बैठकीत शहर काँग्रेसकडून अहवाल सादर केला जाणार असून, त्याआधारे जागांची मागणी राष्ट्रवादीकडे करण्यात येणार आहे. या बैठकीकडे शहराचे लक्ष लागले आहे.