अहमदनगर : केडगावची तोडफोड अन् अधीक्षक कार्यालयातील हुल्लडबाजी कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही चांगलीच महागात पडली आहे. याच गुन्ह्यातील सहभागाचा ठपका ठेवून पोलिसांनी आजी-माजी आमदारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव प्रांत कार्यालयात पाठविला आहे.या प्रस्तावावर सुनावणी होऊन संबंधितांच्या हद्दपारीबाबत निर्णय होणार आहे. पोलिसांच्या या हद्दपारी शस्त्रामुळे नेत्यांसह कार्यकर्ते आणि महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारही गॅसवर आहेत. पोलिसांनी प्रांत कार्यालयाकडे पाठविलेल्या प्रस्तावात २० नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत शहरातून हद्दपार करावे अशी शिफारस केलेली आहे. त्यामुळे जे हद्दपार होतील त्यांना निवडणूक काळात शहरात थांबता येणार नाही. हद्दपारीत नाव असलेल्या १२० जणांना १४ नोव्हेंबर रोजी नोटीस पाठविण्यात आली होती. त्यांची शुक्रवारी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यासमोर सुनावणी झाली.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी दोघा शिवसैनिकांचे हत्याकांड झाले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी घटनास्थळी तोडफोड केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ३०० जणांवर गुन्हा दाखल आहे. तसेच याच हत्याकांड प्रकरणाच्या अनुषंगाने ७ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. याप्रकरणात आमदार अरूण जगताप यांच्यासह दोनशेपेक्षा जास्त जणांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हद्दपारीच्या प्रस्तावात जगताप, राठोड यांच्यासह तोडफोडीच्या गुन्ह्यातील बहुतांशी जणांचा समावेश आहे. केडगाव पोटनिवडणुकीतील वाद लक्षात घेत महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल असलेल्यांनाही शहरातून हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर केले आहेत. आता पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावापैकी सुनावणीत किती जणांना शहरातून हद्दपार व्हावे लागणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.प्रस्तावातील नावेसुवेंद्र गांधी, विक्रम राठोड, श्रीपाद छिंदम, किशोर डागवले, गणेश भोसले, शिवाजी कदम, संभाजी कदम, नंदू बोराटे, दिलीप सातपुते, अशोक दहिफळे, बंटी सातपुते, अफजल शेख, हर्षवर्धन कोतकर, गजेंद्र दांगट, विकी जगताप, नरेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब बोराटे, आसाराम कावरे, गणेश हुच्चे, अजय चितळे, सुनील कोतकर, बंटी राऊत, मयूर बोचूघोळ आदींचा समावेश आहे. उर्वरित नावांचे प्रस्ताव तयार असून, शनिवारी सकाळपर्यंत हे प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे जाणार आहेत.पोलिसांनी तयार केलेल्या हद्दपारीच्या यादीत महापालिका निवडणुकीतील २० ते २२ इच्छुकांचा समावेश आहे. प्रांताधिकारी यांनी या इच्छुकांच्या हद्दपारीवर शिक्कामोर्तब केले तर त्यांना शहराबाहेर राहून निवडणूक लढवावी लागणार आहे.
पोलीस ठाणे निहाय प्रस्तावतोफखाना - २३१कोतवाली - २०९भिंगार - १०५एमआयडीसी- ८एकूण : ५५३