अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्ज भरायचा असेल आणि तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला निश्चित अडथळा येणार हे नक्की. अविवाहित असल्याने पती किंवा पत्नी या कॉलममध्ये स्वतंत्र असा शब्द टाकल्यानंतर आॅनलाईन अर्ज पुढे सरकत नसल्याने काही अविवाहित उमेदवारांना बुधवारी तब्बल सात ते आठ तास ताटकळत रहावे लागले.महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल करताना स्वत:चे नाव टाकल्यानंतर दुसरा कॉलम पती किंवा पत्नीचे नाव असा आहे. मात्र जे अविवाहित आहेत, त्यांना या कॉलमवमध्ये काहीच लिहिता येत नाही. त्यामुळे ते स्वतंत्र किंवा इंडिपेंडंट असे लिहता येते. मात्र असा शब्द टाकल्यानंतरही अर्ज पुढे सरकत नसल्याचा अनुभव आला. अर्ज दाखल करण्यासाठी काही उमेदवारांना अॅड. प्रसन्न जोशी मदत करीत होते. जोशी यांनी थेट जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संपर्क साधला. मात्र अर्जातील अडथळा दूर करणे स्थानिक पातळीवर शक्य नव्हते. त्यामुळे जोशी यांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर बुधवारी रात्री अडथळा दूर झाला आणि अविवाहितांचा अर्ज पुढे सरकला. मात्र त्यासाठी सात ते आठ उमेदवारांना सात तास आॅनलाईन ताटकळत रहावे लागले.