अहमदनगर : नगर शहरासह ग्रामीण भाग, राहाता, श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. त्याखालोखाल अकोले, राहुरी, पारनेर, कर्जत, कोपरगावमध्येही शंभराच्या पुढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. रविवारी एकाच दिवशी २४१४ पॉझिटिव्ह आले आहेत, तर उपचार घेणाऱ्यांची संख्या १२ हजार ८५८ इतकी झाली असून एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. रविवारी आढळून आलेली २४१४ ही रुग्णसंख्या आतापर्यंतची एका दिवसातील सर्वोच्च संख्या आहे. कोरोनाच्या आकड्यांनी रोज नवे रेकॉर्ड तयार होत आहे. रविवारी नगर शहरानंतर राहाता,श्रीरामपूर, नगर ग्रामीण, अकोले, राहुरी, पारनेर, कर्जत, कोपरगावमधील एका दिवसात येणारी रुग्णसंख्या शंभरच्या पुढे जात आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये चिंता वाढली आहे.
रविवारी जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९०२, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४९२, अँटिजेन चाचणीत ११०० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये अहमदनगर शहर (५३१), राहाता (२८१), श्रीरामपूर (२४३), नगर ग्रामीण (१९८), अकोले (१७१), राहुरी (१५४), पारनेर (१३७), कर्जत (१३५), कोपरगाव (११०), भिंगार (८७), शेवगाव (७१), संगमनेर (७०), नेवासा (६५), पाथर्डी (५९), जामखेड (४९),श्रीगोंदा (४३),मिलिटरी हॉस्पिटल (६),इतर जिल्हा (४), इतर राज्य (०) येथील रुग्णांचा समावेश आहे.
रविवारी १६१७ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १ हजार ९०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८७.८२ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १२ हजार ८५८ इतकी झाली आहे. जिल्ह्यात रविवारी एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.
-------------
कोरोना स्थिती
एकूण रुग्ण संख्या- १,१६,०४७
बरे झालेले -१,०१,९०७
उपचार सुरू-१२८५८
मृत्यू-१२८२
--------------
मेडिकलवरील रेमडेसिविरची विक्री थांबविली
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी रात्री रेमडेसिविर इंजेक्शन थेट कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी सकाळपासून किरकोळ विक्रेत्यांना किंवा ज्या मेडिकलची यादी जाहीर करण्यात आली होती, त्या औषध दुकानांमधील विक्री थांबविण्यात आली आहे. त्यामुळे आता इंजेक्शन थेट कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना मिळणार आहे. या आदेशामुळे रविवारी प्राप्त झालेले इंजेक्शन मेडिकलमध्ये न देता थेट कोविड हॉस्पिटलमध्येच देण्यात आल्याचे आरोग्य यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले.