योगेश गुंडनगर : ज्या नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या जोरावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप अहमदनगरमधून खासदारकीच्या मैदानात उतरले त्याच होमग्राउंडवर त्यांची पीछेहाट झाली. त्यामुळे त्यांचा विधानसभेचा मार्गही आता खडतर बनला आहे.‘दूरचा नको जवळचा हवा’ ही राष्ट्रवादीची हाक नगरकरांनी साफ नाकारत भाजपच्या विखेंच्या पारड्यात मतांचे भरघोस दान टाकत नगर शहरातून निर्णायक आघाडी दिल्याने जगतापांच्या आमदारकीच्या अडचणीत वाढली झाली आहे. विकासाच्या मुद्याला नगरकरांनी पसंती देत भौगोलिक भेदभाव नाकारला. यामुळे नगर शहरात शिवसेनच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.गेल्या तीन वर्षांपासून अहमदनगर शहरात तळ ठोकलेल्या विखेंचा नगर शहर विकासाचा मुद्दा नगरकर मतदारांना भावला. जगताप यांची उमेदवारी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जाहीर झाल्याने वेळ, प्रचार यंत्रणा, निवडणुकीची तयारी व आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचविण्यास त्यांना पुरेसा अवधी मिळाला नाही. ज्या नगर शहरातून ते दोनदा महापौर व एकदा आमदार म्हणून निवडून आले, त्याच नगर शहरातून विखे यांनी ५३ हजारांहून अधिक आघाडी घेतली. विखे बाहेरच्या मतदार संघातील असल्याने राष्ट्रवादीने त्यांना ‘परके’ असे संबोधत नगरकरांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांनी या भौगोलिक वादाच्या फंदात न अडकता विखेंच्या विकासाच्या मुद्यावर आपल्या मतांची मोहोर उमटविली. सन २०१४ मध्ये भाजपला नगर विधानसभा मतदारसंघात ३८ हजार मतांची आघाडी होती. यावेळी ती वाढली. गत विधानसभेत जगताप यांनी अनिल राठोड यांचा पराभव केल्याने सेना जगतापांवर सूड उगविण्याची संधी पाहत होती. विखेंमुळे सेनेला ही आयती संधी मिळाली. शिवसेनेने भाजपपेक्षा दोन पावले पुढे जात विखे यांच्या विजयासाठी जंगजंग पछाडले. दिलीप गांधी नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांचा प्रभाव मतांवर जाणवत नाही. उलट विखे यांचे मताधिक्य वाढले आहे. सेना आता विधानभेला याचा फायदा घेईल.आगामी विधानसभेच्या प्रवासात अडचणराष्ट्रवादीकडून पराभूत झालेले संग्राम जगताप नगर शहराचे विद्यमान आमदार आहेत.मात्र या निवडणुकीत नगर शहरातूनच विखे यांनी मोठी आघाडी घेत जगताप यांना घरच्या मैदानावरच जोरदार धक्का दिला .घरच्या मैदानावर झालेली पिछाडी जगताप यांच्या आगामी विधानसभेच्या प्रवासात मोठी अडचण ठरणारी आहे.दहशत ,गुंडगिरी या मुद्यावर सेना भाजपने त्यांचावर टीकेची झोड उठविली. त्याला त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यातच नगर शहर विकासाच्या मुद्यावर जगताप यांच्याकडे कोणताच वेगळा कार्यक्रम नसल्याने मतदारांनी त्यांना सपशेल नाकारल्याचे दिसते.
की फॅक्टर काय ठरला?केडगाव हत्याकांडापासून जगताप वर्षभर राजकारणापासून काहीसे दुरावल्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला.मनपा निवडणुकीत त्यांची व भाजपची छुपी युती असल्याचा आरोप झाल्यामुळे स्वपक्षातील निष्ठावंत दुखावले.जगतापांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे राहून त्यांची राजकीय प्रतिमा मलिन झाली. त्यांच्यावरील नकारात्मक आरोपच जास्त चर्चेत राहिल्याने त्यांच्यावरील नाराजी मतदारांनी व्यक्त केली.विद्यमान आमदारसंग्राम जगताप । राष्टÑवादी काँग्रेस