अहमदनगर : मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा असलेले, तसेच रस्तालुटीतील फरार दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. या टोळीकडून एका गावठी कट्ट्यासह चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.याबाबत १७ जुलै २०१७ रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गौरव रंधवे (रा. केडगाव) यांनी फिर्याद दाखल केली होती. रंधवे हे केडगावहून त्यांच्या मामाच्या गावी कर्जतकडे जत्रेला जात असताना नगर-सोलापूर रस्त्यावर आंबिलवाडी शिवारात रंधवे यांना काही अज्ञात चोरट्यांनी गावठी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडील २२० पल्सर ही दुचाकी हिसकावून घेत पोबारा केला होता. याबाबत रंधवे यांनी नगर तालुका पोलिसांत फिर्याद दिली. त्याच दरम्यान अशा प्रकारे रस्तालुटीच्या अनेक घटना घडल्याने पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला या प्रकारांचा छडा लावण्याची कामगिरी सोपवली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी या गुन्ह्यांचा अभ्यास करून गुन्हा करण्याची पद्धत व यापूर्वी रेकॉर्डवर असलेल्या आरोपींची माहिती घेऊन तपास सुरू केला. त्यात त्यांच्या गळाला चौघाजणांची एक टोळी लागली. पुणे, बीड, अहमदनगर अशा विविध ठिकाणी हे गुन्हेगार रस्तालुटीच्या घटना करून मोटारसायकली पळवत होते.स्थानिक गुुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी जात शिताफीने या आरोपींना गजाआड केले. यात राज ऊर्फ ऋतुराज ऊर्फ अभिजित किसन शिंदे (वय २३), बालवीर ऊर्फ बाळू ऊर्फ महाराज सावळेराम शिंदे (वय २२, दोघेही रा. सालेवडगाव, ता. आष्टी. जि. बीड), गणेश मच्छिंद्र चांदगुडे (वय २०, रा. लोणी सय्यदमीर, ता. आष्टी, जि. अहमदनगर), शुभम ऊर्फ चिकण्या विष्णू जाधव (वय २१, मोरगव्हाण, ता. नेवासा, जि. अहमदनगर) या अट्टल गुन्हेगारांचा समावेश आहे. यांना ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी केली असता या आरोपींनी आंबिलवाडी शिवार, ७ जुलै २०१७ रोजी मांडवगण फाट्यावर, तसेच मोहटादेवी (ता. पाथर्डी) परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले.
शिक्रापूरमध्ये मोक्कांतर्गत कारवाई
हे आरोपी सराईत व संघटित गुन्हेगार असून त्यांच्यावर नगर, बीड, पुणे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे रस्तालुटीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच शिक्रापूर (जि. पुणे) येथील पेट्रोलपंप चालकास लुटल्याच्या गुन्ह्यात या आरोपींवर शिक्रापूर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. परंतु तेव्हापासून ते फरार होते.
.... तोपर्यंत चप्पल घालणार नाही
यातील राज ऊर्फ अभिजित शिंदे हा निर्ढावलेला गुन्हेगार असून त्याने अहमदनगर येथे एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. त्या मुलीवर आपले प्रेम असून, तिच्याशीच लग्न करण्याचा पण त्याने केला होता. यात मुलीच्या आई-वडिलांनी हस्तक्षेप केल्याने त्यांचाही खून करणार असून तोपर्यंत चप्पल घालणार नसल्याचे तो सांगतो, अशी माहिती या विक्षिप्त आरोपीबाबत पोलिसांनी यावेळी दिली. परंतु पोलिसांनी वेळीच या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.