योगेश गुंडअहमदनगर : नगरचे नागपूर म्हणून प्रसिद्ध असणारे नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील ५०० एकर संत्रा बागा दुष्काळी परिस्थितीमुळे जळाल्या आहेत़ संत्रा बागांना देण्यासाठी पाणीच नसल्याने शेतकरी व फळबागा संकटात सापडल्या आहेत. फक्त संत्र्यामुळे कोट्यवधींचे उत्पन्न मिळवणारे शेतकरी आता आर्थिक चक्रव्यूहात सापडले आहेत़गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याला वसलेले, तिन्ही बाजूंनी उंच डोंगररांगा असणारे नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी हे गाव संत्रा उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. हलकी व वाळवट जमीन, पाण्याचा निचरा करण्याची क्षमता असणारी माती, गार व स्वच्छ हवामान यामुळे या गावात संत्राचे फळ मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या गावात सुमारे ५०० एकर क्षेत्रावर संत्रा फळांची लागवड करण्यात आली. मात्र सतत दोन वर्षांपासून तालुक्यात दुष्काळ पडत असल्याने या बागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सुमारे ३०० एकर संत्रा बागा पाण्याअभावी शेतकऱ्यांनी तोडून त्याचे सरपण केले. पाण्याअभावी गेल्या दोन वर्षांपासून या गावातील संत्रा फळांचे उत्पादन ठप्प झाले आहे. काही शेतकऱ्यांनी टँकरने विकतचे पाणी आणून कशाबशा बागा जगवण्याचा प्रयत्न चालवला आहे. विकतच्या पाण्यासाठी एकरी ५० हजारांचा खर्च येत असल्याने उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाही़ त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक चक्रव्यूहात सापडला आहे़ काही शेतकरी संत्रा बागांऐवजी डाळिंब लागवडीकडे वळाले आहेत.येथील संत्रा नगर, पुणे, मुंबई, केरळ येथे विक्रीसाठी जातात. अनेक व्यापारी थेट गावात येऊन संत्रा खरेदी करतात. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे संत्रा फळांचे उत्पादन कमालीचे घटले आहे.संत्रा फळांच्या विक्रीतून सर्व खर्च वजा करता एकरी ६० ते ७० हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न शेतकºयांना मिळते. एकरी १० टन इतक्या फळांचे उत्पादन शेतकरी घेत होते. मात्र, यंदा हाती काहीच न लागल्याने शेतकरी उद्ध्वस्त होत आहे़आमच्याकडे पाच एकर संत्रा बाग होती़ मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आता केवळ अडीच एकर संत्रा बाग आहे़ निम्म्या बागा आम्ही तोडल्या आहेत. पाणी नसल्याने संत्रा बागा जळून चालल्या होत्या. सरकारने फळबागा जगवण्यासाठी योजना राबवल्या तरच भविष्यात फळबागा जगवता येईल. -कमालभाई शेख, संत्रा उत्पादक शेतकरीआमच्याकडे दोन एकरची संत्रा बाग होती़ मात्र पाण्याअभावी आम्ही बाग काढून टाकली़ तीन शेततळे आहेत. मात्र ते सर्व कोरडेठाक आहेत. संत्रा बाग नसल्याने आमचे वर्षाला पाच लाखांचे नुकसान झाले आहे. -सुभाष वाघ, माजी सरपंच, पिंपळगाव उज्जैनी
नगरचे नागपूर संकटात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 3:39 PM