- अण्णा नवथर अहमदनगर - नगर अर्बन बँक च्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा न्यायाधीश एस.व्ही . सहारे यांनी गुरुवारी चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.
नगर अर्बन बँक तिच्या गैर व्यवहाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. शासनाने या प्रकरणी नियुक्त केलेल्या एजन्सीने फॉरेन्सिक रिपोर्ट आर्थिक गुन्हे शाखेला सादर केला आहे. त्यामध्ये आरोपी प्रदीप जगन्नाथ पाटील व राजेंद्र शांतीलाल लुलिया , या दोघांचा प्रत्यक्ष सहभाग आढळून आला आहे. या दोघांनाही बुधवारी सायंकाळी अटक करण्यात आली होती. त्यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी पक्षाच्या वतीने एडवोकेट राहुल कोळेकर यांनी काम पाहिले.
दावा दीडशे कोटींचा, घोटाळा ३०० कोटींच्या घरातनगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी राजेंद्र ताराचंद गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात एकत्रित गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या तक्रारीत बँकेच्या विविध प्रकरणांमध्ये दीडशे कोटींचा घोटाळा झाला असल्याचे असल्याचा दावा केला होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. सदर गुन्ह्याचा तपास सुरू झाला. दरम्यान फॉरेन्सिक रिपोर्ट साठी मुंबईतील संस्थेची नेमणूक करण्यात आली. या संस्थेने चौकशी करून फॉरेन्सिक रिपोर्ट सादर केला असून, त्यामध्ये २९१ कोटी २५ लाख रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे म्हटले आहे.