अहमदनगर : नगर अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेची तब्बल २२ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदार, जामिनदार व पुरवठादार एजन्सीचे संचालक अशा एकूण सात जणांविरोधात शनिवारी (दि. ३) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बँकेचे प्रमुख व्यवस्थापक महादेव पंढरीनाथ साळवे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. निलेश विश्वास शेळके याच्यासह डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे, डॉ. रवींद्र दौलतराव कवडे, भास्कर रखमाजी सिनारे, गिरीश ओमप्रकाश अगरवाल, निर्मल एजन्सीचे योगेश मालपाणी व स्पंदन मेडिकेअर,पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल असलेल्या डॉक्टरांनी नगर शहरात उभारलेल्या एम्स हॉस्पिटलमध्ये मशिनरी खरेदी करण्यासाठी अर्बन बँकेच्या केडगाव व मार्केट या शाखेतून सन २०१४ मध्ये २२ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज घेतल्यानंतर मात्र हॉस्पिटलसाठी कोणत्याही प्रकारची मशिनरी खरेदी न करता निर्मल एजन्सी व स्पंदन मेडिकेअर या फर्मबरोबर संगनमत करून कर्जाची रक्कम डिलरच्या खात्यातून रोहिणी सिनारे व उज्वला कवडे यांच्या वैयक्तिक खात्यात ट्रान्सफर करून घेतली व त्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावली. तसेच ज्या कारणासाठी कर्ज घेतले होते त्याचसाठी पैशांचा वापर न करता ही रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरून बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.
अर्बन बँकेवर १ आॅगस्ट २०१९ पासून प्रशासकांची नियुक्ती झालेली आहे. प्रशासक यांनी दिलेल्या लेखी आदेशानुसार प्रमुख व्यवस्थापकांनी ही फिर्याद दाखल केली आहे.
एम्स हॉस्पिटल संदर्भात दुसरा गुन्हाएम्स हॉस्पिटलमध्ये मशिनरी खरेदी करण्यासाठी अहमदनगर शहर सहकारी बँकेने १७ कोटी २५ लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप करून फसवणूक केल्याप्रकरणी डॉक्टर निलेश विश्वास शेळके याच्यासह बँकेच्या संचालक मंडळ व अधिकाºयांविरोधात सप्टेंबर २०१८ मध्ये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉ. उज्वला रवींद्र कवडे, नगरमधील डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे या तिघांनी स्वतंत्र फिर्याद दिली होती. या फिर्यादीनुसारच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सध्या तपास सुरू आहे.