विनायक डिक्करअहमदनगर : १९५० आणि ६० चे दशक हिंदी चित्रपटांच्या दृष्टीने सुवर्णकाळ म्हटले जाते. दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद या त्रिमूर्तींनी हा काळ गाजविला. अर्थात त्यांच्यासोबत अनेक अभिनेत्यांचे चित्रपटही यावेळी प्रदर्शित व्हायचे पण दिलीप, राज आणि देव यांची जादू त्या पिढीने अनुभवली. सुरुवातीच्या काळात सिनेमा तांत्रिकदृष्ट्या आजच्याइतका प्रगत नसायचा तरीही या कृष्णधवल चित्रपटांनी रसिकांना खिळवून ठेवले.याच सुवर्णयुगाच्या स्मृती पुन्हा एकदा नगरकरांना अनुभवायास मिळणार आहेत. त्याची सुरुवातही झाली आहे. जुन्या काळात गाजलेले हिंदी-मराठी चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. सिने नॉस्टाल्जिया या उपक्रमांतर्गत त्याची सुरुवात १० जुुलैपासून आशा चित्रपटगृहात झाली आहे. मधुमती, श्री ४२० आणि सीआयडी हे चित्रपट आतापर्यंत दाखविण्यात आले. प्रत्येक आठवड्यात बुधवार आणि गुरुवारी सायंकाळी या चित्रपटांचे शो आयोजित केले आहेत. दि.३१ आणि १ रोजी अशोककुमार, मधुबाला यांचा ‘हावडा ब्रिज’ पाहता येईल. चित्रपट जरी जुनी असले तरी सध्याच्या काळानुरूप ध्वनीव्यवस्था त्यासाठी आहे. नगरचे ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक नंदकिशोर आढाव आणि दिलीप अकोलकर यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. किमान एक वर्षभर हा उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी रसिकांना आपल्या सूचना, अभिप्रायदेखील कळविता येणार आहे. आशा चित्रपटगृहाचे मालक विलास करंदीकर यांचेही बहुमोल सहकार्य या उपक्रमास लाभणार आहे. हा उपक्रम वर्षभर चालू राहिल्यास त्याची विक्रम म्हणून नोंद होईल. नगरकर रसिकांना उत्तमोत्तम दर्जेदार चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याचा आनंद मिळणार आहे. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, के.आसिफ, रामानंद सागर, गुरूदत्त, बी. आर. चोप्रा, एस.मुखर्जी आदी दिग्दर्शक तर प्रभात, जेमिनी, वासन अशा नामांकित बॅनरचे चित्रपट या उपक्रमात समाविष्ट असणार आहेत.उपक्रमास प्रतिसाद देऊन यात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.