लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध करून दिल्यानंतर सद्यस्थितीत महावितरणचे राज्यात ६५ लाख वीजग्राहक दरमहा सरासरी १,४१६ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करत आहेत. यामध्ये अहमदनगर मंडळात १ लाख ९९ हजार ग्राहकांनी ३८ कोटी ६३ लाख रुपयांचा भरणा ऑनलाईन केला आहे.
महावितरणची वेबसाईट व मोबाईल ॲप तसेच ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा क्रेडिट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात वीजबिल भरणा केंद्राच्या लाईनमध्ये उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ऑनलाईन वीजबिल भरण्याची सोय वीज ग्राहकांना उपलब्ध आहे.
महावितरणने लघुदाब वीज ग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी ‘महाडिसकॉम’ ही वेबसाईट तसेच जून २०१६पासून मोबाईल ॲपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी नेट बॅंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वाॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वीज ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याला वीज ग्राहकांची पसंती वाढली आहे.
लघुदाब वीज ग्राहकांना ऑनलाईन बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅंकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. याआधी नेट बॅंकिंगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु, क्रेडिट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबिट कार्ड, कॅशकार्ड, युपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे.