अहमदनगर : कोपरगामध्ये भाजपाचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. याशिवाय भाजपाचे विजय वहाडणे यांनी अर्ज ठेवल्याने कोपरगावमध्ये चौरंगी लढत होणार आहे. श्रीगोंद्यातून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे, पारनेरमधून सेनेचे जिल्हा परिषद संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, आणि पाथर्डीतून हर्षदा काकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीने दिलेल्या उमेदवारांवर नाराज असलेल्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. युतीच्या जागा वाटपात श्रीगोंदा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपाने तिथे माजीमंत्री पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. खासदार सुजय विखे हे नागवडे यांच्या माघारीसाठी प्रयत्नशील होते. नागवडे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी अर्ज मागे घेतला. सेनेचे पारनेरमध्ये आमदार विजय औटी यांना उमेदवारी बहाल केली आहे. तेथे सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. तो त्यांनी मागे घेतला. याशिवाय पारनेरमधून राष्ट्रवादीत नाराज असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी अर्ज दाखल केला होता. झावरे यांनी विखे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे जाहीर केले आहे. पारनेरमध्ये कार्ले, झावरे आणि माधवराव लामखेडे यांनी तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, कार्ले व झावरे यांनी औटी यांच्या विरोधातील तलवार म्यान केली. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातही भाजपमधून बाहेर पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला केला. लोकसभा निवडणुकीत काकडे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आल्या होत्या. पण, त्या राष्ट्रवादीत सक्रिय झाल्या नाहीत. परंतु त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
नागवडे, काकडे, झावरे, कार्ले यांची माघार; परजणे, वहाडणे मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 4:41 PM