श्रीगोंदा : राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात १९ ते २१ जानेवारी दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन केल्याची माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
मंगळवारी (दि.१९) कारखाना कार्यस्थळावर सकाळी ८ वाजता व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सकाळी ९.३० वाजता प्रतिमा पूजन व अभिवादन सभेचे आयोजन केले आहे. मंगळवारी (दि.१९) सकाळी १० वाजता आदर्श गाव पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे यांचे ‘माणसात देव आहे’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८.३० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधा नागवडे यांच्या हस्ते होणार आहे. ‘महाराष्ट्र काल, आज आणि उद्या’ या विषयावरील दुसरे पुष्प बुधवारी (दि.२०) सकाळी १० वाजता औरंगाबाद येथील विचारवंत सचिन तायडे हे गुंफणार आहेत. तिसरे व्याख्यान बुधवारी सकाळी १० वाजता होणार असून संत साहित्याचे अभ्यासक उल्हास पवार यांचे होणार असून ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. डाॅ. अशोक देशमुख यांचेही व्याख्यान होणार आहे.