श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी १२ हजार सभासद व ३३ सोसायटी प्रतिनिधींची नावे मतदार यादीतून वगळली होती; पण त्यावर आपण आवाज उठवला. ही नावे मतदार यादीत समाविष्ट होण्याची चाहूल लागताच नागवडेंनी सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून ठराव केला. मग अगोदर सभासदांची नावे मतदार यादीतून वगळलीच का, असा सवाल कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांनी केला.
श्रीगोंदा येथे मगर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मगर म्हणाले, नागवडेंनी कारखान्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. कामगारांचे पगार केले नाहीत. डिस्टिलरी, सहवीज निर्मिती प्रकल्प तोट्यात आहे.
जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार म्हणाले, नागवडे साखर कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. भ्रष्टाचारावर घाव घालण्यासाठी निवडणूक लढवावी लागणार आहे. नागवडेंनी भ्रष्टाचाराचा कारभार दडपण्यासाठी पक्षांतरे केली.
पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे म्हणाले, नागवडेंच्या या कारभारामुळे कारखाना दोन वर्षांत दिवाळखोरीत निघेल. या दिशेने चालू आहे. आम्हाला केशवभाऊंच्या रूपात शिवाजीबापू दिसत आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.
यावेळी ॲड. बाळासाहेब काकडे, शांताराम भोयटे, अजित जामदार, ॲड. बापूसाहेब भोस आदी उपस्थित होते.
-------------------------------
दिशाभूल करणे विरोधकांचा एककलमी कार्यक्रम
: राजेंद्र नागवडे
श्रीगोंदा :
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद व्यक्ती व संस्थांना होऊ घातलेल्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा, अशी मागणी करणारा ठराव नागवडे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला आहे. यापूर्वीही तशी भूमिका घेतली होती. मात्र, विरोधकांचा सभासदांची दिशाभूल करणे हा एककलमी कार्यक्रम आहे, असा टोला नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी मारला आहे.
नागवडे म्हणाले, एखाद्या निवडणुकीत सभासदांना मतदानाचा अधिकार देताना अगर नाकारताना काही अटींचा आधार घेतला जातो. त्यानुसार नागवडे कारखान्याच्या काही सभासदांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागण्याची परिस्थिती होती. ते टाळण्यासाठी आपण यापूर्वीच महिला सभासदांची वार्षिक सभेची अनुपस्थिती क्षमापित केली आहे.
त्याअनुषंगाने रविवारी (दि.२१) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव केला.
नागवडे साखर कारखान्याची निवडणूक लागणार आहे. त्यामुळे काही मंडळींनी कारखान्यात भ्रष्टाचार झाला. कारखाना दिवाळखोरीत निघेल. डिस्टिलरी चालते, को-जनरेशन बंद पडते. कामगारांचे पगारच थकले आहेत. आम्हीच बापूंचे वारसदार आहोत. असे वाट्टेल तसे आरोप करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. त्यांना काय बोलायचे ते बोलावे. या मंडळींचा घोडा मैदानात सभासद हिशेब चुकता करतील, असा विश्वास नागवडे यांनी व्यक्त केला.