अहमदनगर : शहरात बहुतांशी जणांनी आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी झाडांना खिळे ठोकून तेथे पोस्टर, मोठमोठाले फलक, भित्तीपत्रक लटकविली आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होऊन झाडांनाही ईजा पोहोचते. आता झाडांना खिळे ठोकून जाहिरातबाजी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा मनपा प्रशासनाने ईशारा दिला आहे. येत्या तीन दिवसांत संबंधितांनी खिळे ठाेकून लावलेले फलक काढून घ्यावेत, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचेही मनपाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या बहुतांशी वृक्षांवर खोडाला खिळे ठोकून त्यावर फलक लटकविलेले दिसतात. या प्रकारामुळे झाडांना इजा पोहोचते तसेच सौदर्यासहही बाधा निर्माण होते. त्यामुळे झाडांचे अशा पद्धतीने विद्रुपीकरणास बंदी असून याबाबत शासनानेच तसे आदेश जारी केलेले आहेत. आता झाडांना खिळे ठोकून जाहिरात करताना कुणी आढळून आले तर संबंधितांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ अन्वये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाणार आहे.