खर्डा : जिवंत व्यक्तीलाच श्रद्धांजली वाहण्याचा प्रकार तेलंगशी (ता. जामखेड) येथे घडला. या प्रकारामुळे नातेवाईक, मित्रांकडून होणाऱ्या चौकशीने ती व्यक्ती व त्याचे कुटुंबीय हैराण झाले आहेत. नाव साधर्म्यामुळे हा प्रकार घडला असावा असा अंदाज आहे.जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील के.के.बँजो ग्रुपच्या वाहनाचा १२ जूनला खर्ड्याजवळच (ता. जामखेड) अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये ढोलकी वादक किशोर गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. त्या अपघातानंतर मात्र के. के. बॅँजो ग्रुपचे संचालक किशोर जावळे यांचे निधन झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. किशोर जावळे यांचे मित्र, नातेवाईक यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे दूरध्वनीवरून चौकशी सुरू केली. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जिवंत असल्याचे सांगितले. किशोर जावळे नव्हे तर किशोर गायकवाड यांचे निधन झाले, अशा पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकल्या. मात्र घटनेच्या आठ दिवसानंतरही त्यांना राज्यभरातून दूरध्वनी येत आहेत. सारख्या येणाºया फोनमुळे त्यांनी मोबाईल संच बंद करून ठेवला आहे. किशोर जावळे यांनी ‘आई तुझ्या मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही’ हे गीत गायले होते. ते गाणे त्यांनी वर्षभरापूर्वी ‘यू ट्यूब’वर शेअर केले होते. त्याला लाखो व्ह्यूज मिळाले होते. त्यामुळे ते राज्यभर परिचित आहेत. तसेच बेंजो पार्टीमुळेही त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या मृत्युच्या खोट्या पोस्टमुळे कुटुंबीयही हैराण झाले आहेत.
नाव साधर्म्यामुळे उडाला गोंधळ : जिवंत व्यक्तीलाच सोशल मीडियावर श्रद्धांजली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 3:05 PM