अहमदनगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी पडद्याआडून राजकीय घडामोडी सुरु आहेत. अध्यक्षपदासाठी माजी आमदार राहुल जगताप व चंद्रशेखर घुले यांच्या नावाची चर्चा आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी येत्या शनिवारी सभा बोलविण्यात आलेली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून गाठीभेटी घेतल्या जात आहेत. पडद्याआडून घडामोडी सुरु आहेत. बँकेतील नवनिर्वाचित संचालकांवर नजर टाकल्यास राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. त्यामुळे बँकेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल, असे दिसते.
राष्ट्रवादीकडून श्रीगोंद्याचे आमदार माजी आमदार राहुल जगताप व चंद्रशेखर घुले पाटील यांचे यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये जगताप व घुले यांच्या नावाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
तसेच जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबत उपमुख्यमंत्री पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातही एक बैठक झाल्याचे समजते. या बैठकीमध्ये ही अध्यक्ष व उपाध्यक्षाबाबत चर्चा झाली.
राष्ट्रवादीकडून श्रीगोंद्याचे राहुल जगताप यांचे नाव चर्चेत आहे. यांच्याकडे सध्या कुठलेही पद नाही. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी केली नव्हती. श्रीगोंद्यात विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे आहे.
राष्ट्रवादीचे दुसरे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्याकडे अनुभवी संचालक म्हणून पाहिले जाते. याशिवाय मंत्री बाळासाहेब थोरात यांचे संबंध एकमेकांना मदत करणे असेच आहेत. त्यामुळे घुले थोरात यांच्यामार्फत आपले नाव पुढे करू शकतात.
श्रीगोंद्याचे शिष्टमंडळ मंगळवारी अजित पवारांना भेटणार
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप हे इच्छुक आहेत. त्यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी द्यावी, या मागणीसाठी श्रीगोंद्यातील राहुल जगताप यांचे शिष्टमंडळ येत्या मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. यावेळी राहुल जगताप यांच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.