अहमदनगर : ‘पंतप्रधान नरेंद्र मोंदीचे उद्या भाषण आहे़ शुक्रवारी सर्वांनी वेळत शाळेत हजर रहा’ असा फतवा गुरुवारीच शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी काढला होता़ त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता़ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बहुतांशी शाळेत पंतप्रधान मोदींचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती़ अनेक शाळांमध्ये मात्र, विजेची व्यवस्था नव्हती, काही ठिकाणी टिव्ही, तर काही ठिकाणी चॅनलला रेंज मिळत नव्हती त्यामुळे शिक्षकांची चांगलीच धावपळ झाली़ अनेक ठिकाणी रेडिओवरूनच विद्यार्थ्यांना भाषण ऐकविण्यात आले़ दुपारी ३ वाजता सुरू झालेले मोदींचे भाषण सायंकाळी ४़४५ वाजता संपले़ तांत्रिक अडचणींमुळे भाषणात खंडही पडत होता़ पाऊण तासात पंतप्रधानांचे संवादरुपी भाषण विद्यार्थ्यांनी ऐकले़ अनेक विद्यार्थ्यांना हे भाषण चांगल्याप्रकारे समजले़ तर काहींच्या डोक्यावरून गेले़ जिल्ह्यात नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या ५ हजार २०० प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये मोदी गुरूजींचे भाषण ऐकले गेले. जनरेटरसाठी धावपळपाथर्डी: शहर व तालुक्यातील बहुतांशी शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी टी.व्ही.एल.सी.डी. व जनरेटरची सोय करण्यात आली होती. काही शाळेत जनरेटर आणण्यासाठी शिक्षकांना मोठी धावपळ करावी लागली. तालुक्यातील १७६ शाळेत दूरदर्शन तसेच १३१ ठिकाणी रेडिओची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तांत्रिक अडचणीमुळे पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यात अडथळे आले़ ग्रामीण भागातील ज्या शाळांमध्ये टी.व्ही.जनरेटरची व्यवस्था नव्हती तेथे विद्यार्थी, शिक्षकांची चांगलीच निराशा झाली़ गावातील एका मोठ्या हॉलमध्ये टी.व्ही.ची सोय केली होती. मुलांप्रमाणेच शिक्षकही भाषण ऐकण्यासाठी आतूर होते. शुक्रवारी सकाळी शहर व तालुक्याच्या काही गावात पावसाने हजेरी लावल्यामुळे बऱ्याचशा शाळांनी हॉलमध्ये एल.सी.डी.लावून भाषण ऐकले. भाषण संपेपर्यंत शाळेच्या आवारात शुकशुकाट होता़ कर्जतमध्ये उत्साह कर्जत - तालुक्यातील विविध विद्यालयातील सुमारे ४६ हजार विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोंदीचे भाषण ऐकले़ भाषणासाठी शाळा व माध्यमिक विद्यालयांमध्ये टीव्ही, एलसीडी व रेडिओची व्यवस्था करण्यात आली होती़ पंतप्रधानांचे भाषण ऐकायला मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठा उत्साह होता़ मात्र, तांत्रिक बाबींची व्यवस्था करण्यासाठी अनेक ठिकाणी शिक्षकांची मोठी धावपळ झाली़ ५० हजार विद्यार्थ्यांनी ऐकले मोदींना शेवगाव - तालुक्यातील २५९ प्राथमिक शाळा व ४८ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे ५० हजारांवर विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांचे भाषण ऐकले़ या उपक्रमासाठी ठिकठिकाणी दूरदर्शन तसेच इंटरनेटच्या माध्यमातून तसेच दुर्गम परिसरात रेडिओ, जनरेटर आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तालुक्यातील १७६ शाळेत दूरदर्शन तसेच १३१ ठिकाणी रेडीओची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. शेवगाव रेसीडेन्शिल विद्यालयाचे प्राचार्य सुधाकर दातीर, पर्यवेक्षक दिलीप फलके यांच्या मार्गदर्शनाखाली १६ वर्गातील हजारो विद्यार्थ्यांनी आय. सी. टी. संगणक माध्यमातून या कार्यक्रमाचा आनंद लुटला. भारदे विद्यालयात शाळा समितीचे अध्यक्ष हरीष भारदे, प्राचार्य गोरक्षनाथ बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सभागृहात लावण्यात आलेल्या जम्बो स्क्रिनवर हा सोहळा अनेकांनी अनुभवला राक्षी, आबासाहेब काकडे विद्यालय, खंडोबानगर प्राथमिक शाळा आदी ठिकाणी भाषणासाठी व्यवस्था करण्यात आली होती़ दोन दिवसांपासून तयारी नगर : उपलब्ध भौतिक सुविधांची वाणवा असूनही तालुक्यातील बहुतांशी शाळांमध्ये नमो गुरुजींच्या तासाचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला़ विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचा सुसंवाद दाखविण्यासाठी मात्र, अनेक ठिकाणी गुरूजींची दमछाक झाली़ या सुसंवादासाठी गेल्या दोन दिवसांपासून विविध शाळांत तयारी सुरू होती़ आज प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांचा सुसंवाद काळजीपूर्वक ऐकला़ आदर्श गाव हिवरेबाजार येथे मोठ्या सभागृहात हा संदेश ऐकविण्यात आला़ टाकळी खातगाव येथील शाळेत टिव्ही संच नसल्याने रेडिओवर भाषण ऐकविण्यात आले़ तर निंबळक येथे प्रत्येक घरात दहा ते बारा विद्यार्थी बसवून पंतप्रधानांचे भाषण ऐकविण्यात आले़ इसळक येथील जि़प़ शाळेत टिव्ही ची व्यवस्था नसल्याने सरपंच संजय गोरगे यांच्या घरात विद्यार्थ्यांना बसवून भाषण ऐकविण्यात आले़ ग्रामीणचे प्रश्नच नाहीपारनेर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण ४२८ शाळांमधील सुमारे ४६ हजार विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांचा संवाद ऐकला़ तालुक्यात इंटरनेटचे प्रभावी जाळे नसल्याने टिव्ही व रोडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भाषण ऐकविण्यात आले़ मोदींना प्रश्न विचारणारे बहुतांशी विद्यार्थी हे शहरातील असल्याने आमचे प्रश्न कुणी विचारलेच नाही असे अनेक विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले़ तालुक्यातील पारनेरसह कान्हुरपठार,राळेगणसिध्दी,ढवळपुरी,सुपा,रांजणगाव मशीद, पळवे खुर्द, वाडेगव्हाण, निघोज,जवळा,देवीभोयरे, वडझिरे, अळकुटी, लोणीमावळा, टाकळी ढोकेश्वर, वडगाव सावताळ, खडकवाडी, कर्जुले हर्या यासह तेवीस केंद्रांमधील शाळांनी सहभाग नोंदविला.शिर्डीत तांत्रिक अडचणीची बाधाशिर्डी : राहाता तालुक्यात प्राथमिक व माध्यमिकच्या २१८ शाळांमध्ये सुमारे पंचावन्न हजार विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी हजेरी लावल्याचे गटशिक्षण अधिकारी उमेश डोंगरे यांनी सांगितले़ काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना कार्यक्रम सुरळीतपणे बघता आला नसल्याचेही त्यांनी सांगितले़देशाचे पंतप्रधान आपल्याशी थेट संवाद साधणार या कल्पनेने शुक्रवारी सकाळपासुनच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता जाणवत होती़ तर शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर प्रथमच घडलेलं हे अप्रूप बघायला, अनुभवायला शिक्षकही आतूर होते़ शाळांमध्ये हा कार्यक्रम दाखवण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून तयारी सुरू होती़ शुक्रवारी शाळाही दुपारी भरवण्यात आल्या़ दुपारी अडीच पासूनच विद्यार्थी टीव्ही समोर बसले़ काहींना जागेच्या अडचणीमुळे स्पिकरवरुन कार्यक्रम ऐकावा लागला़ विद्यार्थ्यांनी शांतपणे हा कार्यक्रम बघितल्याचे साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिवगजे,आदर्श शाळेचे मुख्याध्यापक सुर्यवंशी, उर्दु शाळेचे पटेल, सय्यद आदींनी सांगितले़ शिर्डीतील संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील इंग्लिश मेडियम, कन्या शाळा, आयटीआय, कनिष्ठ महाविद्यालय तसेच साईनाथ हायस्कूल, आदर्श शाळा, जिल्हा परिषद शाळे बरोबरच उर्दु शाळेनेही विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम दाखवण्याची व्यवस्था केली़उर्दु शाळेतील विद्यार्थीही पंतप्रधानांच्या भाषणाने प्रभावीत झाले होते़ रूकसार अजमल इकबाल शाह व मसहुद मुस्ताक शहा या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान त्यांच्याशी बोलल्याचा आनंद होता़ पंतप्रधानांच्या आयुष्यातील अनुभवांचा आम्हाला भावी आयुष्यात उपयोग होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली़ (तालुका प्रतिनिधी)शिक्षकांची धावपळसंगमनेर : शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण तालुक्यातील ५०९ शाळांमधील ८४ हजार ८८४ मुलांनी ऐकले. मात्र, हे भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्यासाठी शिक्षकांची मोठी धावपळ झाली़शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना दाखविणे क्रमप्राप्त असल्याने शिक्षकांची भलतीच धावपळ उडाली. टी.व्ही व रेडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मोदींचे भाषण ऐकले. ४२३ शाळांमध्ये टी.व्ही.च्या माध्यमातून ७२ हजार ३०८ मुलांनी मोदींना पाहीले. तर ८६ शाळांमध्ये रेडीओवर १२ हजार ५०६ मुलांनी मोदींचे भाषण ऐकले. विशेष म्हणजे ५० शाळांमध्ये प्रोजेक्टर असूनही त्यांचा उपयोग केला गेला नाही. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविल्याचे अहवाल प्रत्येक शाळेकडून पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने मागविले. गटशिक्षणाधिकारी वसंत जोंधळे यांच्या आदेशाने सर्व केंद्र शाळांवर खबरदारी घेण्यात आली होती. विस्तार अधिकारी श्रीमती कमल भालेराव यांच्यामार्फत सायंकाळी आठ वाजेपर्यंत शाळांचे अहवाल गोळा करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)
पाच हजार शाळेत ‘नमो’ गुरुजींचा क्लास
By admin | Published: September 05, 2014 11:47 PM