शिवाजी पवार
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : हरेगाव येथील चार तरुणांच्या अमानुष मारहाण प्रकरणातील फरार आरोपी नाना गलांडे टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी रिपाइंने १५ सप्टेंबरला रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. याप्रश्नी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.
आरोपी नाना गलांडे टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी सावकारकीच्या धंद्यातून लुबाडलेल्या लोकांच्या जमिनी परत कराव्यात, अशी रिपाइंची मागणी आहे. पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी थोरात व त्रिभुवन म्हणाले, आरोपी नाना गलांडे आजही मोकाट फिरत आहे. त्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला आहे. त्याला त्वरित अटक करून टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अन्यथा शुक्रवारी सकाळी अकरा वाजता डॉ. आंबेडकर स्मारक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. यावेळी रिपाइं नेते राजाभाऊ कापसे, बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी, हरेगावचे सरपंच दिलीप त्रिभुवन, तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट उपस्थित होते.