हळगाव : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी लागु असतानाही तोंडाला मास्क न लावता विनाकारण गावात फिरताना आढळून आलेल्या हळगाव परिसरातील नान्नज येथील तिघा इसमांविरोधात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, करोना प्रतिबंधात्मक उपायासंदर्भात जामखेड पोलिसांचे एक पथक जामखेड तालुक्यातील हळगाव, नान्नज परिसराच्या गस्तीवर होते. नान्नज गावात पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना या पथकाल काही इसम गावात विनाकारण फिरताना व तोंडाला मास्क न लावल्याच्या अवस्थेत आढळून आले. यावेळी पोलिस कर्मचार्यांनी त्यांना हटकले असता त्या इसमांना समाधानकारक उत्तर देता आली नाहीत. सध्या करोनामुळे सर्वत्र आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण कायदा लागु आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी विनाकारण विना मास्क घराबाहेर पडण्यावर प्रशासनाने निर्बंध घातलेले आहेत. या निर्बंधाचे जो कोणी उल्लंघन करेल त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश आहेत. याच आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हेड काँस्टेबल शिवाजी भोस यांच्या फिर्यादीवरून जामखेड तालुक्यातील नान्नज येथील विष्णू किसन मोहळकर, दत्तात्रय नारायण काटे,बंडु बबन गाजरे या तिघा या इसमांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास नान्नज पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार विठ्ठल चव्हाण हे करत आहेत.
दरम्यान करोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी पुढील काही दिवस विनाकारण, विनामास्क घराबाहेर पडू नये. प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोर पालन करावे. लॉकडाऊन काळात लागु असलेल्या कायद्याचे जर कोणी उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील व सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी दिला आहे.