अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या_दारी या शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा पुढचा टप्पा पार पडला. यावेळी या जिल्ह्यातील २४ लाख ४८ हजार लाभार्थ्यांना ३ हजार ९८२ कोटी रुपयांच्या लाभ देण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांनी संबोधित केले.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या आजवरच्या १२ कार्यक्रमातून राज्यभरातील १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे प्रत्यक्ष लाभ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही संकल्पना बदलण्यासाठी या उपक्रमाला सुरुवात केली होती असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमातच ज्येष्ठ लोककलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांना ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला तसेच लोककलावंताना देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनाचा लाभ देखील त्यांना देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
राज्यातील निम्म्या साखरेचे उत्पादन एकट्या अहमदनगर जिल्ह्यातून होते. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला असल्याचे यावेळी नमूद केले. समृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि परिसराच्या विकासाचे नवीन पर्व सुरू होणार असल्याचेही यावेळी बोलताना स्पष्ट केले. राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य माणसाचे सरकार असून १५ ऑगस्ट पासून सर्व शासकीय रूग्णालयात आता मोफत उपचार मिळत असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून ५ लाखांपर्यंत विनामूल्य उपचार करण्याचा लाभ सरसकट सगळ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. समुद्राला वाहून जाणारे पाणी वळविण्यासाठी शासन काम करत आहे. या माध्यमातून भविष्यात राज्यातील अनेक भाग दुष्काळमुक्त होणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसरात्र मेहनत करून देशाला नव्या उंचीवर घेऊन जात असून जनतेचा सेवक म्हणून आपण काम करत असल्याचे ते आजही म्हणतात. गेल्या नऊ वर्षांत देशात आजवर न झालेले अनेक निर्णय घेऊन अशक्य ते शक्य त्यांनी करून दाखवले असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.