आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ ३ - किसान क्रांतीच्या सूकानू समितीने संप मागे घेतल्याचे जाहीर केले असले तरी नगर जिल्ह्यातील शेतकरी संपावर ठाम आहेत़ संपाचे केंद्रबिंदू पुणतांबा गावातील ग्रामस्थांनीही संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कायम ठेवल असून, प्रहार संघटनेने नगर-मनमाड महामार्ग अडविला तर शेतकरी संघटनेने नगर-औरंगाबाद रस्त्यावरील नेवासाफाटा येथे रास्ता रोको केला़ मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यात आला़मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर किसान क्रांती समन्वय समितीचे जयाजी सुर्यवंशी व धनंजय जाधव यांनी संप मागे घेतल्याची घोषणा मुंबई येथून केली़ घोषणा केलेल्या समन्वय समितीचे कार्यकर्ते अद्याप नगरमध्ये दाखल झालेले नाहीत़ दरम्यान संपाचे केंद्रबिंदू असलेल्या पुणतांबा गावातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा विरोध करत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे़ यासंदर्भांत समन्वय समितीच बैठक घेवून पुढील रणनिती आखली जाणार आहे़ संपकरी शेतकऱ्यांनी नियोजनानुसार रास्ता रोको, दुध व भाजीपाल्याची नाकाबंदी कायम ठेवली आहे़ नगर-मनमाड महामार्गावर प्रहार संघटनेचे अजय बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला़ त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बराचवेळ विस्कळीत झाली होती़ कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणी गावात ग्रामसभा घेवून मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव करण्यात आला़ याशिवाय नगर-औरंगाबाद महामार्गावर शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार रास्ता रोको करण्यात आला़ पांढरीपूल येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध, भाजीपाला रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला़ त्याचबरोबर संपाबाबतची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बैठका होणार असून, दुपारनंतर संपाबाबतचे चित्र स्पष्ट होईल़
नगरकर संपावर ठाम; रास्ता रोको, बंद सुरूच
By admin | Published: June 03, 2017 1:48 PM