लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम येथे दररोज वेटिंग असते. गेल्या आठ दिवसांपासून येथील अमरधाम स्मशानभूमीत रोज ४० ते ४२ जणांवर अंत्यसंस्कार होत आहेत. त्यातील २० अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीत तर उर्वरित २० ते २२ मयतांचे अंत्यसंस्कार लाकडाचे सरण रचून केले जात आहेत.
महापालिकेने मागील लॉकडॉनमध्ये विद्युत दाहिनी संख्या एकने वाढविली. परंतु, मृतांचा आकडा वाढल्याने २० ते २२ मृतदेहांवर लाकडांद्वारे अंत्यविधी होत आहेत. त्यासाठी दररोज एक लाखाहून अधिक खर्च होत आहे. त्यामुळे अंत्यविधीचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. ग्रामीण भागातून कोरोनाचे गंभीर रुग्ण येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होतात. जिल्हा रुग्णालयात गेल्या आठवडाभरात सुमारे ४०० जणांचा मृत्यू झाला. तसेच खाजगी रुग्णालयातून दररोज ५ ते ६ मृतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथे आणले जातात. अंत्यविधीसाठी महापालिकेची यंत्रणा कार्यरत असते. परंतु, कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूच्या संख्येने ही यंत्रणा कमी पडू लागली आहे. मागील लॉकडाऊनमध्ये अंत्यविधीसाठी वेटिंग होती. त्यामुळे महापालिकेने आणखी एक विद्युत दाहिनी खरेदी केली. सध्या अमरधाम स्मशानभूमीत दोन विद्युत दाहिन्या कार्यरत आहेत. दररोज ४० ते ४५ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागत आहे. अमरधाम येथील विद्युत दाहिन्यांमध्ये दररोज २० मृतदेहांवरच अंत्यसंस्कार होतात. उर्वरित २० ते २५ मृतदेहांवर लाकडांद्वारे अंत्यविधी करावे लागत आहेत. अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत अंत्यविधीसाठी लाकडे उपलब्ध करून दिली दिली जात असून, त्यावर एकाचवेळी अंत्यविधी उरकले जात आहेत. मृतांचा आकडा वाढल्यामुळे महापालिकेची धावपळ सुरू आहे. मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी एकच शववाहिका होती. त्यात वाढ करण्यात आली आहे.