संगमनेर : नाशिक-पुणे महामार्ग ३१ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त होणार आहे. त्यासोबतच आमच्या इतरही मागण्या पूर्ण होणार आहेत. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक अनिल गोरड, तहसीलदार अमोल निकम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. संचालक गोरड यांनी लेखी दिल्याने आम्ही बेमुदत उपोषण स्थगित करत असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी सांगितले.
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारपासून (दि.४) बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. महामार्गाची दुरवस्था झाल्याने वारंवार अपघात घडतात. अनेकांचा जीवही जातो. भरमसाठ टोल आकारून देखील मुख्य रस्ता, सर्व्हिस रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हीच बाब होणाऱ्या अपघातांना कारणीभूत आहे. त्यामुळे टोलनाका प्रशासनाशी संबंधित सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. यांसह एकूण सहा मागण्या करण्यात आल्या होत्या. सोमवारी (दि. ७) उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक गोरड यांनी उपोषणाला बसलेल्यांची भेट घेतली. तसेच परिसरातील काही गावांतील ग्रामस्थांशी चर्चा केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, एनएसयूआय तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश शिंदे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विजय रहाणे, दत्तात्रय खुळे, संकेत खुळे, निलेश गुंजाळ, अक्षय खुळे, किरण घोटेकर, मनीष माळवे, बंटी मंडलिक आदी उपस्थित होते.
उपोषणाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय भालेराव, शहराध्यक्ष राहुल वर्पे, अमोल राऊत, नितीन आहेर, गजानन भोसले, प्रसाद काळे, अशोक काळे, तुषार वाळे, विकी पवार, शशिकांत पवार, गणेश गुंजाळ हे बसले होते. त्यांना लिंबू सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले.
अन्यथा टोलनाका बंद आंदोलन
३१ डिसेंबरपर्यंत नाशिक-पुणे महामार्ग खड्डेमुक्त न झाल्यास तसेच आमच्या इतरही मागण्या मान्य न झाल्यास टोलनाका बंद आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनात केवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेस नव्हे तर संपूर्ण संगमनेर तालुक्यातील जनता एकत्र येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी दिला आहे.