अहमदनगर : देशभरात उसळलेल्या मोदी लाटेवर स्वार होत खासदार दिलीप गांधी यांनी राष्टÑवादीच्या तगड्या आव्हानाला मोडून काढले. सलग दुसर्यांदा आणि एकूण तिसर्यांदा लोकसभेत प्रवेश सुनिश्चित करणार्या गांधी यांनी प्रतिस्पर्धी राष्टÑवादीचे राजीव राजळे यांचा २ लाख ९ हजार १२२ हजार मतांनी केलेला पराभव आजवरचा त्यांचा सर्वात ठसठशीत विजय ठरला. निकालावरुन नगरची लढत ‘थेट’ ठरली. गांधी यांनी १० लाख ६० हजार ४३८ मतदानापैैकी ६ लाख ५ हजार १८५ मतदारांचा विश्वास जिंकला. त्यांच्या मतांची ही टक्केवारी ५७.६ टक्के! प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांनी ३ लाख ९६ हजार ६३ मतांपर्यंत म्हणजेच ३७.३४ टक्कांपर्यंत मजल मारता आली. झालेल्या मतदानापैैकी या दोघांच्या मतांची बेरीज १० लाख १ हजार २४८ होते. त्याची टक्केवारी ९६ ! त्यामुळे यापूर्वी दोन वेळा तिरंगी लढतीत मतांच्या फाटाफुटीचा फायदा घेत विजय मिळवणार्या गांधींनी पहिल्यांदा थेट निम्म्यांवर मते खेचत विजय अधिकच दिमाखदार केला. यानिमित्ताने राष्टÑवादी आघाडीने आखलेल्या सार्या मनसुब्यांवरही पाणी फेरले. एवढेच कशाला, गांधीच्या पराभवासाठी अप्रत्यक्ष काम करणार्या पक्षांतर्गत आणि मित्रपक्षातील विरोधकांवरही आज त्यांचा विजय ‘साजरा’ करण्याची वेळ आली आहे. राष्टÑवादीला ‘मोदी लाटे’ची जाणीव झाली होती. त्यामुळे प्रचारात त्यांनी सातत्याने मोदींवर टीका केली. गांधी दुबळे उमेदवार आहेत, असाही एक ‘अतीआत्मविश्वासी’ मतप्रवाह राष्टÑवादीत तयार झाला होता. अर्थात निवडणूकीपूर्वीची स्थिती त्याला कारणीभूत होती. (पान ४ वर) या कारणांमुळे मिळाला विजय यंदा मोदी लाट आपल्याला तारणार याची जाणीव दिलीप गांधींना आधीच झाली होती. त्यामुळे तिकीट जाहीर होण्याआधीच मोदी आर्मीच्या माध्यमातून वातावरण निर्मितीवर भर दिला. एकीकडे आघाडीने प्रचार सभा, रॅलींचा धडाका लावलेला असताना भाजपाने घरोघरी पोहचण्याची रणनिती आखली. विस्कटलेली यंत्रणा अखेरच्या टप्प्यात एक‘संघ’ झाली. ‘दिलीप गांधींना मतदान, नरेंद्र मोदी पंतप्रधान’ या घोषवाक्याचा परिणामकारक वापर केला. पक्षांतर्गत विरोधकांचे मन वळविण्यात यश आले आणि विरोधी आघाडीतील नाराजीचा फायदा घेतला.
गांधींचा राष्टÑवादीला दे धक्का
By admin | Published: May 17, 2014 1:26 AM