कोपरगाव : उद्योग क्षेत्राशी निगडित असलेल्या काॅन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) या संस्थेने ‘नॅशनल एनर्जी इफिशिएन्सी सर्कल काॅम्पिटिशन २०२१’ या स्पर्धेअंतर्गत घेतलेल्या स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला ऊर्जा क्षेत्रात नियोजनबद्ध व कार्यक्षम वापराबद्दल ‘बेस्ट ॲप्लिकेशन ॲण्ड युजेस ऑफ रिन्युवेबल एनर्जी’ हा पुरस्कार देऊन देश पातळीवरील प्रथम पुरस्काराने गौरविले.
ही स्पर्धा विशेषकरून ऊर्जा क्षेत्रात कार्यक्षमरीत्या कामगिरी करत असलेल्या उद्योगांसाठी असते. संजीवनी ही शैक्षणिक संस्था असूनदेखील उर्जा क्षेत्रात आपली भरीव कामगिरी सिद्ध केली आणि भारतातील नामांकित कंपन्यांमधूनही मुसंडी मारून एसएमई वर्गवारीतून प्रथम पुरस्कार प्राप्त केला. एसएमई वर्गवारीत ऊर्जेशी निगडित विविध स्पर्धांमध्ये यश मिळविण्याचे संजीवनीचे हे चौथे वर्ष आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.
कोल्हे म्हणाले, संस्थेतील डीन आर. ॲण्ड डी.चे प्रमुख डाॅ. आर.ए. कापगते यांनी ऑनलाइन माध्यमाद्वारे ऊर्जेशी निगडित प्रत्यक्षात वापरत असलेल्या विविध उपक्रमांविषयी सादरीकरण केले. या सादरीकरणात संजीवनीमध्ये उभारलेल्या ५०० किलोवॅटचा सोलर वीज प्रकल्प, त्यामुळे वर्षभरात टळणारे विषारी वायूंचे उत्सर्जन, वृक्ष संवर्धन, सांडपाणी शुद्धीकरण प्लॅन्ट व त्या पाण्याचा वृक्षांसाठी पुनर्वापर, झाडपाल्यांपासूनचे खत व त्याचा वृक्षांसाठी वापर, कॅम्पस व सभोवतालच्या कामांसाठी इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर करणे इत्यादी बाबींची माहिती देण्यात आली होती. या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनराव कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले तसेच डाॅ. कापगते यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कारही केला. या वेळी संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ विजय नायडू व डाॅ. ए.जी. ठाकूर उपस्थित होते.