अण्णा नवथरअहमदनगर: सावेडी गावातील विजयाची गणिते नातेसंबधावर अवलंबून आहेत़ येथे भाजपसमोर राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्षांनीही मोठे आव्हान उभे केल्याने सर्वच लढती लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत. सर्वच जागांवर संघर्ष पहायला मिळत आहे.भाजपचे स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे या प्रभागातून लढत आहेत. त्यांचा हा बालेकिल्ला आहे. त्यांचा संपर्क आहे. मात्र यावेळी सेनेने त्यांच्याविरोधात अर्जून बोरुडे यांना मैदानात उतरविलेले आहे. बोरुडे यांनी यापूर्वी वाकळे यांना दोन वेळा पराभूत केलेले आहे. त्यामुळे ही झुंज कडवी होईल, असे बोलले जाते. आम आदमीचे भरत खाकाळ हेही रिंगणात आहे.महिला प्रवर्गात भाजपच्या विद्यमान नगरसेविका मनिषा बारस्कर-काळे अपक्ष म्हणून उभ्या आहेत. भाजपने त्यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेल्या वंदना ताठे यांना उमेदवारी दिली. काळे या भाजपच्या एकमेव नगरसेविका आहेत की ज्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यांचे पती राजेंद्र काळे हे ‘सीए’ असताना त्यांनाही उमेदवारी दिली नाही. यावरुन भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला आहे. काळे यांनी थेट खासदार दिलीप गांधी यांच्यावर निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप केला आहे. भाजपचे निष्ठावान व संघाचेही कार्यकर्ते आपणासोबत असल्याचा काळे यांचा दावा आहे. गांधी यांचे विरोधकही काळेंसोबत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या प्रभागातील निकालाकडे संपूर्ण भाजपचे लक्ष आहे. काळे हे महापौर पदाचे दावेदार होतील या कारणामुळे त्यांना तिकीट नाकारल्याचे बोलले जाते. भाजपचा येथे स्वत:शीच संघर्ष आहे. काळे, ताठे यांच्यासह सेनेकडून पुष्पा वाकळे, भाकपकडून उज्वला वाकळे, राणी भुतकर लढत आहेत. महिलांमध्ये कडवी झुंज आहे.सर्वसाधारण गटात भाजपचे रवींद्र बारस्कर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आकाश दंडवते यांनी आव्हान उभे केले आहे. दंडवते यांचा या प्रभागात संपर्क व नातेगोते आहे. राष्टÑवादीकडून माजी महापौर अभिषेक कळमकर या प्रभागातून लढणार होते. मात्र त्यांनी दंडवते यांना उमेदवारी दिली. दंडवते यांच्यासाठी कळमकर, आमदार संग्राम जगताप, संजय सत्रे हेही प्रचारयंत्रणा राबवत आहेत. या गटात सेनेकडून रवींद्र वाकळे, किशोर जोशी, पवन कुमटकर, राजू भिंगारदिवे मैदानात आहेत. त्यांचेही मोठे आव्हान आहे.अनुसूचित जाती महिला राखीव गटात सेनेकडून विद्यमान नगरसेविका सारिका भुतकर मैदानात आहेत. त्यांचा सामना भाजपच्या आरती बुगे व राष्ट्रवादीच्या मंदा गंभीरे यांच्याशी आहे.
सावेडी गावात राष्ट्रवादी-भाजप-सेनेत झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 3:49 PM