शेवगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनजागरण मोहिमेंतर्गत गुरूवारी शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. इंधन दरवाढीसह अत्यावश्यक वस्तूंची दरवाढ सरकारने तातडीने कमी करून सर्व सामान्यांना दिलासा देण्याची मागणी करीत तहसील कार्यालयात दीड तास ठिय्या आंदोलन केले.कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप्रणित सरकारने आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेला झुलवित ठेवले आहे. विकासाच्या बाबतीत प्रसिद्धी माध्यमाद्वारे होत असलेल्या जाहिरातबाजीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून सरकारमध्येच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर कमी झालेले असल्याने देशात व राज्यात इंधनाचे दर कमी होणे गरजेचे होते. पण सातत्याने होत असलेल्या देशांतर्गत इंधन दरवाढीमुळे सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास सुरू आहे. जनतेचा रेटा वाढल्यानंतर आधी रूपयांमध्ये केलेली इंधन दरवाढ पैशात कमी करून सरकारने भूलभुलैय्या करीत जनतेच्या भावनांशी खेळ सुरू केल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नायब तहसीलदार माधव गायकवाड यांनी हे निवेदन स्वीकारले.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे, बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, उपसभापती रतन मगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष ताहेर पटेल, संजय फडके, बप्पासाहेब लांडे, विष्णूपंत बोडखे, सागर फडके, वहाब शेख, अण्णासाहेब क्षीरसागर, गोविंद कडमिंचे, राम शिदोरे, इम्रान शेख, अमर जाधव, संदीप म्हस्के, कृष्णा ढोरकुले, अजिम काझी, गंगाधर शितोळे, रोहन साबळे, विकास फलके, कृष्णा पायघन, पांडुरंग मरकड, कलीम पठाण आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली दरवाढीविरोधात आंदोलन पुकारण्याचा इशारा रायुकाँचे ताहेर पटेल यांनी यावेळी दिला.