पारनेर : पारनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी गणेश शेळके व उपसभापतीपदी राणी लंके यांची बिनविरोध निवड झाली.दोन्ही पदे मिळवून शिवसेनेने सत्ता कायम राखली. तर दोन दिवसांपूर्वी एकत्रित लढा देण्याचे निश्चित केल्यानंतर मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्याने दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची वेळ आली.आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सात तर काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादीचे तीन असे संख्याबळ होते. सभापतीपदासाठी सेनेकडून गणेश शेळके व राष्ट्रवादीकडून गंगाराम रोहोकले तर उपसभापती पदासाठी सेनेकडून राणी लंके, काँग्रेसचे डॉ. भास्कर शिरोळे यांनी उमेदवारी अर्ज भरले. यावेळी सेनेकडून कोणी नाराज होईल व काहीतरी चमत्कार घडेल अशी शक्यता दोन्ही काँग्रेसला होती. पण आमदार विजय औटी यांनी खेळी करताना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दहा मिनिटे बाकी असताना सेनेचे दोन्ही अर्ज भरण्यास शेळके व लंके यांना पाठविले. मतदानाच्या दहा मिनिटे आधी स्वत: सगळ्यांना बरोबर घेऊन पंचायत समितीत सोडले. तर विद्यमान उपसभापती अरूणा बेलकर यांच्या नाराजीची शक्यता वर्तवून राष्ट्रवादीतील जवळा गणाच्या सदस्य अनिता आढाव यांना मतदानाला अनुपस्थित ठेवण्याची खेळी केली. आमदार औटी यांच्या डावपेचात अडकल्याचे लक्षात येताच दोन्ही काँग्रेसचे उमेदवार रोहोकले व शिरोळे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे शेळके व लंके यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी आमदार विजय औटी, सेनेचे रामदास भोसले, सुरेश बोऱ्हुडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पारनेरमध्ये राष्ट्रवादीत फूट
By admin | Published: September 14, 2014 11:06 PM