पाथर्डी : शहरात गेल्या सहा महिन्या पूर्वी दीड कोटी रूपये खर्चुन पाथर्डी नगरपालिकेने बसविलेल्या एलईडी पथदिव्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पालिकेवर मोर्चा नेण्यात आला. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.एलईडी पथदिवे बसविण्यासाठी १ कोटी ५१ लाख रूपये मंजूर झाले आहेत. त्यातून नगरपालिकेने ४५० पथदिवे बसविले आहेत. यातील काही पथदिव्याची किंमत २७ हजार ५०० रूपये तर काही दिव्यांची ३४ हजार ५०० रूपये दोन वेगळे खर्च दाखविले आहेत. काही पथदिवे बंद पडले आहेत. याबाबत मुख्याधिकाºयांनी चौकशी समिती नेमली. परंतु चौकशी समितीवर ठेकेदारच असल्याचे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी येत्या १० दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन आंदोलकाना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, बबनराव सबलस,पांडुरंग हंडाळ, जुनेर पठाण,लालभाई शेख,विवेक देशमुख,राजेंद्र नांगरे,संतोष वाघमारे,किशोरजी डांगे, शेखर चितळे, किशोर परदेशी,आकाश वारे,आदी जण उपस्थित होते.मुख्याधिकारी, नगराध्यक्ष गैरहजरयेत्या १० दिवसात पथदिवे गैरव्यवहाराची चौकशी झाली नाही तर, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा प्रतिक खेडकर यांनी दिला आहे. यावेळी आंदोलकांनी नगरपालिकेचे दालन घोषणाबाजींनी दणाणून सोडले. यावेळी मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ तसेच नगराध्यक्ष उपस्थित नव्हते.