--------
३१ मे हा विस्मृतीत गेलेला निसर्ग अभ्यासक सॅम्युअल बेकन फेअरबॅन्क यांचा स्मृतिदिन आहे. त्यांचे वास्तव्य बराच काळ अहमदनगर शहरात होते. आजही त्यांची कबरनगरमध्ये आहे. स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देणारा हा विशेष लेख.
---------
अहमदनगर जिल्हा हा संत, महंत यांचा जिल्हा म्हणून चिरपरिचित आहे. कारण या जिल्ह्याला मराठी साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. मराठी भाषेची आभूषणे ठरलेले "लीळाचरित्र" आणि "ज्ञानेश्वरी" याच जिल्ह्यात साकारली गेली. विविध धर्म पंथांतील लेख-कवींनी या मातीची साहित्य परंपरा सुजलाम सुफलाम केलेली आहे. फुला-मुलांचे कवी ना. वा. टिळक आणि "स्मृतिचित्रे"च्या लक्ष्मीबाई टिळक यांचे वास्तव्य कितीतरी दिवस नगरलाच होते. आज हे सारं आठवायचं कारण म्हणजे आपल्या नगरच्या मातीत रमलेला, तिथल्या निसर्गाशी संवाद साधणारा, परंतु विस्मृतीत गेलेला महान निसर्ग अभ्यासक म्हणजे सॅम्युअल बेकन फेअरबॅन्क.
दोन-चार वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्याच्या निसर्ग इतिहासाचा मागोवा घेताना फेअरबॅन्क हाती लागला आणि मनात घरच करून बसला. कारण या बहादराने सर्वप्रथम येथील पक्षी जीवनाचा अभ्यास करून तो जगासमोर मांडला. हाच निसर्ग अभ्यासक नगर शहराच्या भूमीत आजही चिरनिद्रा घेत आहे. नगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली त्याची कबर मी आणि निसर्ग मित्रमंडळाच्या सदस्यांनी अहमदनगरची पहिली मंडळी यांच्या सहकार्याने गेल्या वर्षी शोधून काढली. १४ डिसेंबर १८२२ रोजी स्टॅमफर्ड (अमेरिका) येथे एका शिक्षकाच्या घरात सॅम्युअलचा जन्म झाला. १८४५ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यांनी धार्मिक शिक्षण घेतल्याने त्यांना धर्मप्रसारक (मिशनरी) ही उपाधी मिळाली. १९४५ साली एलेन यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर एक वर्षानंतर हे दाम्पत्य अमेरिकन मराठी मिशनच्या कार्यासाठी भारतात (बॉम्बे) दाखल झाले. त्या काळात भारताच्या विविध भागांत अमेरिकन मराठी मिशनचे लोक धर्मप्रसाराचे कार्य विविध मार्गांनी करीत असत. १८५७ साली फेअरबॅन्क हे वडाळा बहिरोबा (तालुका नेवासा) या जेमतेम दोनशे लोकवस्तीच्या गावात दाखल झाले आणि खऱ्या अर्थाने तन-मन-धन देऊन त्यांनी या परिसरात धर्मप्रसाराचे काम केले. धर्मप्रसाराच्या कामासाठी हा गृहस्थ साऱ्या महाराष्ट्रात घोड्यावर, बैलगाडीने आणि कधी रेल्वेनेही फिरला. परिसरातील पशुपक्षी, वनस्पती, कीटक यांचे नमुने संग्रहित केले. त्यांचे शास्त्रीय वर्गीकरण केले. त्याचे विश्लेषण केले आणि ही विविधांगी माहिती आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केली. लिस्ट ऑफ बर्ड्स, कलेक्टेड इन दी व्हीसीनिटी ऑफ खंडाळा, महाबळेश्वर ॲण्ड बेलगम अलाँग दि सह्याद्री मौंटनस ॲण्ड नियर अहमदनगर इन डेक्कन याच शोधनिबंधाने माझी आणि फेअरबॅन्क यांची थेट भेट घडवली.
महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांचे या परिसरातील जैवविविधतेचे नोंद करणारे अनेक शोधनिबंध प्रकाशित आहेत. यापैकी की टू दि नॅचरल ऑर्डर ऑफ प्लॅन्टस इन बॉम्बे प्रेसिडेन्सी, "लिस्ट ऑफ रेपटाइल्स ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी, "लिस्ट ऑफ द डेक्कन फिशेस" ही काही शोधनिंबध.
विल्यम थॉमस ब्लॅनफोर्ड या शास्त्रज्ञाने फेअरबॅन्क यांचे मृदुकाय प्राण्यावरील अभ्यासाची गती पाहून या मृदुकाय प्राण्यांच्या एका वर्गालाच (समुदायाला) "फेअरबॅन्कीआ" असे नाव देऊन त्यांचा सन्मान केलेला दिसतो. विल्यम हेन्री बेन्सन यांनीही एका गोगलगायीला "अकॅटिना फेअरबॅन्की" असं नाव देऊन पक्षी विज्ञानातील त्यांच्या संशोधन कार्याचा गौरव केला. नेचे या वनस्पतीच्या एका प्रजातीलादेखील "लॅर्स्टना फेअरबॅन्की" असेच नाव दिलेले आहे. यावरूनच पशुपक्षी, वनस्पती या निसर्ग घटकांचा त्यांचा असलेला सखोल अभ्यास आणि निसर्ग अभ्यासक त्याची वृत्ती अधोरेखित होते.
१८८९ नंतरच्या सुमारे दहा वर्षांचा काळ त्यांनी तामिळनाडूच्या पलानी हिल्स या प्रदेशात व्यतित केला. तेथेही धर्म प्रसार करताना त्यांनी निसर्गविषयक अनेक शोधनिबंध लिहिले. त्यांनी संग्रहित केलेल्या मृदुकाय प्राणी यांचे नमुने एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल आणि इंडियन म्युझियम कलकत्ता यांच्या शास्त्रीय दस्तऐवजात स्थान मिळवून आहेत. १८९८चा तीव्र उन्हाळा फेअरबॅन्क यांना असह्य वाटू लागल्याने ३१ मे १८९८ रोजी ते कोडाईकॅनाल या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेने निघाले. तथापि, याच दिवशी प्रवासातच वयाच्या ७६व्या वर्षी त्यांची जीवनज्योत मालवली. कोडाईकॅनालवरून त्यांचे कलेवर परत अहमदनगर शहरात आणून येथील ख्रिस्ती कब्रस्तानमध्ये त्यांचे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. याच कब्रस्तानात त्यांच्या कुटुंबीयांच्याही स्मृतिशीला (कबरी) असून, निसर्ग अभ्यासाचे मोठे कार्य उभे करणारे सॅम्युअल फेअरबॅन्क आजही आम्हाला निसर्ग अभ्यासाची प्रेरणा देतात.
-डॉ. सुधाकर कुऱ्हाडे
(लेखक हे मानद वन्यजीव रक्षक आहेत.)