आॅनलाईन लोकमतनेवासा, दि़ २४ - नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या उत्साहात सकाळपासून मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या़ दुपारी १ वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झाले आहे़ उन्हाच्या कडाक्यात मतदानासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे़नेवासा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी बुधवारी सकाळीच मतदान सुरु झाले़ नेवासाचे माजी आमदार शंकरराव गडाख व भाजपाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, मुरकुटे यांना राष्ट्रवादीची साथ लाभली आहे़ तर मुरकुटे यांच्यासह भाजपचे दोन मंत्रीही नेवासा नगरपंचायतीच्या प्रचारात उतरले होते़ बुधवारी सकाळपासून नेवासा नगरपंचायतीसाठी मतदान सुरु झाले़ संवेदशील ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दुपारपर्यंत किरकोळ कुरबुरी वगळता शांततेत मतदान झाले़ दुपारी १ वाजेपर्यंत बहुतेक मतदान केंद्रावर सरासरी ५० टक्के मतदान झाले होते़ या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी उमेदवारांमध्ये चुरस लागली होती. उन्हाचा तडाखा असल्याने सकाळीच मतदान करून घेण्याकडे मतदारांचा कल जाणवला़ या निवडणुकीत अटीतटीच्या लढती असल्याने सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी नेवाशात ठाण मांडले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निवडणूक यंत्रणा दक्ष असून राज्य राखीव दलासह पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नेवासा नगरपंचायत निवडणूक; दुपारपर्यंत ५० टक्के मतदान
By admin | Published: May 24, 2017 1:41 PM