पाथर्डी : शारदीय नवरात्रौत्सवाला मोहटा देवस्थानसह तालुक्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. कोरोनामुळे शासनाने दर्शनासह यात्रेला बंदी घातल्याने हजारो भाविकांनी पायी चालत येत मोहटा देवीच्या पायरीवर डोके टेकून माघारी फिरले. देवी गडासमोरून अनेक भाविकांनी प्रथेप्रमाणे मशाली पेटवून नेल्या. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक कुमार भिलारे व त्यांच्या पत्नी अस्मिता भिलारे यांच्या हस्ते विधीवत घटस्थापना करण्यात आली. वेदशास्त्रसंपन्न बबन देवा कुलकर्णी, राजूदेवा मुळे, भूषण देवा साकरे, शरद देवा कोतनकर यांनी पौरोहित्य केले. वेध मंत्रोच्चाराने गाभारा दुमदुमला. पण स्पीकर नसल्याने मंदिराबाहेर नीरव शांतता होती. घटस्थापनेला विश्वस्त अशोक दहिफळे, अशोक भाऊ दहिफळे, भीमराव पालवे, आदिनाथ आव्हाड, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भनगे, सहाय्यक अधिकारी भीमराव खाडे उपस्थित होते. दुपारनंतर प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार श्याम वाडकर, पाथर्डीचे न्यायाधीश शरद देशमुख, ॲड.विजय वेलदे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे आदींनी भेट देऊन पाहणी केली. |
मोहटादेवी गडावर नवरात्रौत्सवाला प्रारंभ; पायरीवर डोके ठेवून भाविक माघारी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 12:05 PM