पाथर्डी : मोहटा देवस्थानचा यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव, कावडी यात्रा असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शासनाकडून सुधारित आदेश आल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती न्या. अशोक भिलारे व प्रांताधिकारी तथा यात्रा नियंत्रक प्रमुख देवदत्त केकाण यांनी दिली.
नवरात्र उत्सव नियोजन संदर्भात प्रशासकीय बैठक देवस्थान समितीच्या सभागृहात शनिवारी झाली. यावेळी ते बोलत होते. देवस्थान समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश अशोक भिलारे, तहसीलदार शाम वाडकर, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, आगार प्रमुख महेश कासार, वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश मोरे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, विश्वस्त अॅड. विजय वेलदे, भीमराव पालवे, अशोक दहिफळे, आजिनाथ आव्हाड आदी उपस्थित होते.
येत्या १७ तारखेपासून प्रथेप्रमाणे मोहटा देवस्थानमध्ये शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. घटस्थापना सप्तशती पाठ, होमहवन, नित्य महापूजा असे सर्व विधी जमावबंदीचा आदेश पाळून होणार आहेत. गाभाºयामध्ये पुरोहिताशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. कावडी यात्राही प्रतिकात्मक होऊन मुखवटा मिरवणूक देवस्थानच्या वाहनातूनच निघेल. त्यानंतर घटस्थापना होईल.न्या. भिलारे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे पूर्ण नियंत्रण देवस्थान समितीवर असेल. गडाभोवती विशिष्ट अंतरावर भाविकांना रोखून त्यांना माघारी पाठविण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांना अहोरात्र पार पाडावी लागेल. शासनाकडून आलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन केले जाईल.
ंअधिकाºयांविषयी नाराजी..मुख्य प्रशासकीय बैठकीला निमंत्रण देऊनही पोलीस अधिकारी पूर्वसूचना न देता गैरहजर असल्याचे पाहून न्या. भिलारे यांनी नाराजी व्यक्त केली. प्रांतसाहेब याची गंभीरपणे नोंद घेऊन त्यांच्या वरिष्ठाकडे अहवाल पाठवा. बैठकीसाठी प्रतिनिधी चालणार नाही. व्यक्तिश: उपस्थिती आवश्यक आहे, असे न्या. भिलारे म्हणाले.