अहमदनगर - अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मलिक यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजपने गुरुवारी राज्यभर आंदोलन केले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपनेते मलिकांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले होते. अहमदनगरमध्ये माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
विखे म्हणाले, मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले याचे आश्चर्य वाटत आहे. १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेदना अद्यापही कायम आहेत. असंख्य निरपराध माणसे मृत्युमुखी पडल्याच्या स्मृती विरलेल्या नाहीत. या घटनेशी संबंध असलेल्या व्यक्तींशी मंत्री नवाब मलिक यांचे मनी लाँड्रिंग झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांना अटक झाली. तरीही मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार नसतील तर देशहिताशी ही प्रतारणाच म्हणावी लागेल, असे विखे पाटील यांनी सांगितले.
मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर नेमका कोणाचा दबाव आहे? नवाब मलिकांचे बॉम्बस्फोटातील आरोपीशी उघड झालेल्या आर्थिक संबंधांना पाठीशी घालण्याचे काम महाविकास आघाडीकडून सुरू आहे. अशा लोकांना बरोबर घेऊन शिवसेना राज्य करणार का, असा प्रश्नही विखे यांनी उपस्थित केला.
राजीनामा घेणार नाहीच - महाविकास आघाडी
दुसरीकडे मलिक यांची पाठराखण करण्यासाठी महाविकास आघाडी पुढे सरसावली असून कसल्याही परिस्थितीत मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायचा नाही, असा पवित्रा घेत या कारवाईविरोधात राज्यभर आंदोलन करीत जनतेच्या दरबारात जाण्याचा इशारा आघाडीने दिला आहे. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तपास यंत्रणांवर दबाव का आणत आहेत? त्यांची बदनामी का करीत आहेत? असा सवाल करीत भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी ‘नवाब बेनकाब हो गया है’, असे म्हटले आहे. मात्र, राष्ट्रवादीने मुंबईत मलिक यांच्या समर्थनार्थ आंदोनल केल्याचं पाहायला मिळालं.