राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर दिवगंत ज्येष्ठ नेते माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी तालुक्यात सर्वप्रथम राष्ट्रवादीचा झंझावात सुरू केला. मात्र, काही वर्षांतच त्यांनी राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. त्यानंतर, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर, तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादीची हवा झाली. काही काळानंतर कर्डिले यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर, तालुक्यातील राष्ट्रवादीला उतरती कळा लागली. मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला प्रभावी उमेदवारांची शोधाशोध करावी लागली. सध्या तालुक्यात माधवराव लामखडे यांच्या रूपाने एकमेव जिल्हा परिषद सदस्य आहे. पंचायत समितीत राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. सध्या तालुक्यात किसनराव लोटके, केशव बेरड, उद्धव दुसुंगे, अशोक कोकाटे यासारखे मोजकीच मंडळी पक्षाचे अस्तित्व टिकवून होते. तालुक्यात शिवसेना, भाजप व काँग्रेस यांचा प्रभाव वाढत असताना, राष्ट्रवादी पक्ष मात्र फक्त नावालाच उरला होता.
विधानसभेवेळी रोहिदास कर्डिले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना जिल्हा उपाध्यक्ष हे पदही दिले. यानंतर, राजकारणात विखेंचा शिक्का असणारे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अजून पक्षप्रवेश झाला नसला, तरी हातात घड्याळ बांधण्याचे नक्की केले आहे. आता तालुक्यातील रुईछत्तीसी गावचे माजी सरपंच रमेश भांबरे, सरपंच विलास लोखंडे यांच्यासह आदींनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
........................
चौकट -
राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीकडे
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर बाळासाहेब हराळ हेच सर्वप्रथम राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष होते. नंतर काँग्रेस व आता पुन्हा राष्ट्रवादी असा त्यांचा प्रवास आहे. रमेश भामरे यांचा राजकीय श्रीगणेशा राष्ट्रवादीतूनच सुरू झाला होता.
......
राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. कोरोनाचा विळखा वाढत असल्याने प्रवेशाचा कार्यक्रम लांबला आहे.
- बाळासाहेब हराळ, माजी सभापती, जिल्हा परिषद
(फोटो आहेत.)