घारगाव (जि. अहमदनगर): संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी अंतर्गत असलेल्या वांदरकडा येथील नाल्यात तुटलेल्या विजवाहक तारेचा वीजप्रवाह पाण्यात उतरला. या नाल्यात आंघोळीसाठी गेलेल्या अनिकेत बर्डे, ओंकार बर्डे, दर्शन बर्डे, विराज बर्डे चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (८ ऑक्टोंबर) दुपारी घडली होती. या या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अकलापूर येथे सोमवारी सकाळी (दि.१७) बर्डे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. नऊ दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नसल्याचे बर्डे कुटुंबियांनी यावेळी सांगितले. दरम्यान, विरोधी पक्षनेते पवार यांनी बर्डे कुटुंबियांच्या घरकुलासंबंधी संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हे आदिवासी कुटुंब असल्याने शबरी घरकुल योजनेंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी सांगितले. याबाबत पवारांनी थेट आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना फोन लावत त्यांना संपूर्ण घटना समजावून सांगतली. नगर जिल्ह्याचे टार्गेट वाढवून या कुटुंबियांसाठी हे दोन घरकुल मंजूर करा अशी मागणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते पवारांच्या कामाच्या शैलीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. इतर मदतीबाबतही अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी आमदार किरण लहामटे, कॉंग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर,मनसेचे किशोर डोके,राष्ट्रवादीचे कपिल पवार, मुनीर शेख, कॉंग्रेसचे गौरव डोंगरे, बाळासाहेब कुऱ्हाडे,सरपंच अरुण वाघ,विकास शेळके,बाळासाहेब ढोले,संपत आभाळे,योगेश सूर्यवंशी,विकास डमाळे,पांडू शेळके यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पतसंस्थेत पैसे ठेऊन नका
मिळालेली मदत खर्च न करता मुदत ठेवीत ठेवा. पैसे पतसंस्थेत ठेऊ नका पतसंस्था बुडतात. त्यापेक्षा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवा अन्यथा शेतकऱ्यांची बँक असलेल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवा. असा विरोधी पक्षनेते पवारांनी हात जोडून बर्डे कुटुंबियांना सल्ला दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"