कर्जत : तालुका पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. सभापतीपदी मनीषा जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी उपसभापती हेमंत मोरे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, अश्विनी कानगुडे, साधना कदम, प्रशांत बुद्धिवंत, श्याम कानगुडे, नितीन धांडे आदी उपस्थित होते. मावळत्या सभापती अश्विनी कानगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर या निवडीसाठी पिठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.
सभापती पदासाठी मनीषा जाधव यांचा एकमेव अर्ज आल्यावर त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ही निवड जाहीर होताच जाधव समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. यावेळी मनीषा जाधव यांचा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
फाळके म्हणाले, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली येथील पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विकास आणि प्रगतीची घोडदौड सुरू राहील.
मनीषा जाधव म्हणाल्या, आमदार रोहित पवार यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे माझ्या सहकारी अश्विनी कानगुडे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य गृहिणीला सभापतीपदी काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करीन, अशी ग्वाही दिली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल जाधव यांनी काम पाहिले.
---
२६ कर्जत सभापती
कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर मनीषा जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.