अहमदनगर : नगरमधील वाहतूक शहराबाहेरुन वळविण्यासाठी बांधण्यात आलेला बाह्यवळण महामार्ग पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे या बाह्यवळण रस्त्यावरुन वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीने सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागात गेट बंद आंदोलन केले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बाह्यवळण रस्ता पूर्णपणे उखडला आहे़ या रस्त्यावरुन वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे. खड्डे चुकविताना अपघात होतात. वाहनांचे टायर फुटतात. अवजड वाहनांचे पाठे तुटतात. त्यामुळे दोनदोन दिवस वाहने या मार्गावरच दुरुस्तीसाठी अडकून पडतात. याचा वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे वाहन चालक या मार्गावरुन वाहने नेत नाहीत आणि शहरातून वाहने आणल्यास त्यांच्यावर कारवाई होते. त्यामुळे बाह्यवळण महामार्ग त्वरीत दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा दरेकर यांनी केले़ यावेळी किसनराव लोटके, मोहन गहिले, गजेंद्र भांडवलकर, वैभव म्हस्के, अक्षय भिंगारदिवे, किरण ठुबे, अजय शेडाळे, पवन कुमटकर, अजय वाघ, अक्षय रोहोकले, ओमकार गाडळकर, देविदास टेमकर, प्रविण येलुलकर, दीपक दरेकर, आसिफ पटेल आदी उपस्थित होते.
बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादीने केले नगरमधील बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:35 PM