कोपरगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व रस्ते खड्डेमुक्त केल्याचा दावा केला असला तरी कोपरगावातील अनेक रस्ते खड्डेयुक्त असल्यामुळे हे रस्ते दुरुस्त करावेत, यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादीच्यावतीने बल्लाळेश्वराला मंदिरात अभिषेक व सत्यनारायण महापूजा घातली.कोपरगावच्या रस्त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे़ १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा पाटील यांनी केली होती. त्यामुळे कोपरगावातील रस्तेही चकाचक होतील, अशी अपेक्षा कोपरगावकरांना होती. मात्र, शहरासह तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न सुटू शकलेला नाही. कोपरगावातील रस्ते नगरपालिका प्रशासनाच्या हद्दीत येतात. त्यामुळे हे रस्ते नगरपालिकेने तात्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्यावतीने केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांनी गांधीनगरमधील बल्लाळेश्वर मंदिरासमोर अभिषेक व सत्यानारायण महापूजा घालून नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाला सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली. यावेळी नगरसेविका वर्षा गंगुले, प्रतिभा शिलेदार, गटनेते विरेन बोरावके, नगरसेवक संदीप वर्पे, मंदार पहाडे, संदीप पगारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नंदू डांगे आदी उपस्थित होते.
कोपरगावच्या रस्त्यांसाठी राष्ट्रवादीने घातला बल्लाळेश्वराला अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:57 PM