अहमदनगर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात ठाम भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मेपर्यंत भोंगे उतरवण्याचे अल्टिमेटमही दिले आहे. यावरून अद्याप राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही यावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. प्रत्येक घरात सध्या महागाईची चर्चा आहे. भोंगा महत्त्वाचा की महागाई असा प्रश्न प्रत्येकाने घरात विचारला तर ‘महागाई’ असेच उत्तर येईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच सीए संघटनेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे यांनी अनेकविध मुद्द्यांवर भाष्य केले. महाराष्ट्राच्या मातीविरोधात जास्त बोलू नका; अन्यथा महिला लाटणे घेऊन मागे लागतील. त्यांनी लाटणे घेतले तर तुमचे काही खरे नाही, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
समाजात द्वेष पसरवत आहेत
सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता शाब्दिक हल्ला केला. त्या म्हणाल्या, आपण दोन वर्षांनंतर कोरोना महामारीतून बाहेर पडत आहोत. आता कोठे अर्थव्यवस्था सुरळीत होत आहे. अशा परिस्थितीत हे समाजात द्वेष पसरवत आहेत. हे स्वत: काहीही कामे करीत नाहीत. केवळ भाषणे करतात. लोकांना देव, धर्मावरून भडकावतात. आपण मंदिरात प्रसन्न मुद्रेने जातो; पण यांचा मंदिरात गेल्यावर चेहरा पाहा. त्यावर काहीही हावभाव नसतात, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
स्वत:ची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात
लोकांसमोर हे मराठीचा मुद्दा मांडतात; पण यांची स्वत:ची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. यांच्या व्यासपीठावर एकही महिला नसते. महिलांना यांच्या पक्षात काहीही स्थान नाही. आपल्या राज्याची संस्कृती ही संतांची आहे. कुणी दगड उचलणार असेल तरी आपण विचारांची लढाईच लढली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावर आमदार संग्राम जगताप, नीलेश लंके, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बदलण्याची मागणी
नगर जिल्हा राष्ट्रवादीमय करण्यासाठी जिल्ह्याला अधिकाधिक वेळ देणारा पालकमंत्री हवा आहे. जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ हे ज्येष्ठ आहेत. ते त्यांच्या मतदारसंघात वेळही देतात. परंतु ते भेटत नसल्याची नगर जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी यांची तक्रार आहे. त्यांनीही पक्षाकडे या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केलेली आहे. पक्षाने याबाबत निर्णय घेऊन अधिकाधिक वेळ देणारा पालकमंत्री द्यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी खासदार सुळे यांच्याकडे केली.