शिर्डी (जि. अहमदनगर) : राजकारणात राक्षसी महत्त्वाकांक्षा बळावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही आमिष दाखविले जात आहे. मात्र, कोणीही खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.
शिर्डी येथे राष्ट्रवादीचे मंथन शिबिर शुक्रवारी सुरू झाले. त्यात अजित पवार बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.
पक्षप्रमुख शरद पवार यांनी या कार्यक्रमात ऑनलाइन सहभाग घेतला. अजित पवार म्हणाले, की शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठविण्याचा प्रकार महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही. पक्षातून वेगळे होणे एकवेळ समजू शकतो. मात्र, घरच उद्ध्वस्त करण्याची बेईमानी जनतेला पटलेली नाही.
‘शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ’
सरकारमधील व विशेषत: शिंदे गटातील अनेक आमदार आपल्यातील खदखद बोलून दाखवत आहेत. अनेकजण अस्वस्थ आहेत. या सरकारवर टांगती तलवार आहे. त्यांचे सर्व निर्णय रद्द होण्याची भीती आहे, असेही अजित पवार म्हणाले.