अहमदनगर : विदर्भातून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा फेब्रुवारीत नगर जिल्ह्यात धडकणार आहे. दक्षिण व उत्तर नगर जिल्ह्यातून काढण्यात येणा-या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात सरकारविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असताना काँग्रेसच्या गोटात मात्र सामसूम आहे. ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकवाक्यात नाही. जिल्ह्यातील पदाधिका-यांच्या निवडी लांबणीवर पडल्याने पदाधिका-यांना पक्षबांधणीत रसत नाही. पक्षाचा ठोस एकही कार्यक्रम जिल्ह्यात होत नसल्याने पक्षातील अन्य कार्यकर्तेही कमालीचे अस्वस्थ आहेत.राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे जिल्ह्यातील दौरे वाढले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जयंत पाटील राज्यभर फिरत आहेत. मराठवाड्यात गेल्या दहा दिवसांपासून हल्लाबोल यात्रा सुरू आहे. त्यानंतर येत्या फेब्रुवारीमध्ये हल्लाबोल यात्रा नगरमध्ये येणार आहे. यात्रेची रंगीत तालीम आतापासूनच सुरू झाली आहे. पक्षाचे प्रभारी दिलीप वळसे यांच्या उपस्थित सर्व तालुक्यांत मेळावे घेऊन यात्रेसाठी वातावरण तयार केले जात आहे. स्व. वसंतराव झावरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त येत्या शनिवारी पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादीने जिल्ह्यात वाटचाल सुरू केली आहे. परंतु, काँग्रेसचे नेते अद्याप तरी बाहेर पडलेले नाहीत. आक्रोश यात्रा वगळता काँग्रेसने जिल्ह्यात एकही मोठा कार्यक्रम घेतला नाही. पक्षाकडून आलेले कार्यक्रम राबविण्यात कुणाला रस नाही. माजी मंत्री बाळासाहेब थोरात व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यातील वाद शमायला तयार नाही. निवडणुका होऊन तीन वर्षांचा कार्यकाळ लोटला. मात्र राज्यातील पराभवातून जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी धडा घेतलेला दिसत नाही. त्यात महापालिकेचीही निवडणूक वर्षभराने आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसची मात्र शहरात मोठी पडझड झाली आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांच्यानंतर पक्षसंघटना मजबूत करणारा नेता शहरातून काँग्रेसला मिळाला नाही. कुणाचाच पायपोस कुणात नाही़ गुजरात निवडणुकीने पक्षात काहीकाळ उत्साह होता. परंतु, त्यानंतर पक्षातून हालचाली न झाल्याने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
राष्ट्रवादीचा हल्लाबोल, काँग्रेसमध्ये सामसूम; शरद पवार शनिवारी पारनेरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 2:44 PM