संगमनेर : अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे बंदिस्त पाइपलाइद्वारे करावीत, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीने संगमनेर येथील पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला. माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला.अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या कालव्यांची कामे करावीत, यासाठी अनेकदा मोर्चे, आंदोलने करण्यात आली़ कोकणात वाहून जाणारे पाणी भंडारदरा धरणात वळवावे, कोतूळ मार्गावरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, बिताका प्रकल्प पूर्ण करावा, नवीन धोरणानुसार सर्व कालवे बंदिस्त पाइपलाइनद्वारे पूर्ण करावीत, पिंपरकरणे उड्डाणपुलाचे काम पूर्ण अशा विविध मागण्या राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आल्या आहेत. या आंदोलनांच्या पुर्ततेसाठी आंदोलकांच्यावतीने पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरत भजन गाऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
आंदोलनासाठी आमदार वैभव पिचड हे ट्रकमधून पाटबंधारे कार्यालयात दाखल झाले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिनानाथ पांडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.