अहमदनगर : महापाैर निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. महापौरपद सेनेकडे तर उपमहापौरपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. आमदार जगताप कुणाला संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महापौर व उपमहापौर निवडीसाठी येत्या बुधवारी ऑनलाइन सभा होत आहे. महापौरपदासाठी सेनेकडून माजी नगरसेवक संजय शेंडगे यांच्या पत्नी रोहिणी शेंडगे यांचे नाव निश्चित झाले आहे. उपमहापौरपदाचा निर्णय झाला नसला तरी या पदासाठी राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक आहेत. उपमहापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, विनीत पाऊलबुध्दे, कुमार वाकळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या ज्योती अमोल गाडे यांची नावे चर्चेत आहेत. या व्यतिरिक्त आणखी काहीजण इच्छुक आहेत. परंतु, आमदार संग्राम जगताप घेतील तो निर्णय सर्वांना मान्य राहील, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. नगरसेवक गणेश भोसले हे सेनेतून मनसेत गेले. मनसेतून ते राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीकडून त्यांना स्थायी समितीवर सदस्य म्हणून पाठविण्यात आले. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठीही ते इच्छुक होते. मात्र सभापतीपदी अविनाश घुले यांची वर्णी लागली. उपमहापौरपदासाठी ते इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे दुसरे नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्या गाठीशी महापालिकेच्या कारभाराचा दांडगा अनुभव आहे. महापौरपद सेनेकडे असल्याने महापालिकेत सेनेचा वरचष्मा राहील. त्यामुळे उपमहापौरपदाच्या माध्यमातून महापालिकेवर पकड ठेवील, अशा सक्षम आणि अभ्यासू नगरसेवकांना राष्ट्रवादीकडून संधी दिली जाईल. सक्षम उपमहापौर निवडताना आमदार जगताप कोणता निकष लावतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
...............
उपमहापौर झालेल्यांना पालिकेत पुन्हा नो एन्टी
नगर शहरातील ज्यांनी ज्यांनी उपमहापौरपद भुषविले, ते महापालिकेच्या राजकारणातून बाद झालेलेले आहेत, असा पूर्वइतिहास आहे. महापालिकेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्या कार्यकाळात ज्ञानेश्वर खांडरे उपमहापौर झाले. परंतु, ते पुन्हा पालिकेत दिसले नाहीत. उपमहापौर दीपक सुळ हे सध्या राष्ट्रवादीत आहेत. त्यांना महापालिकेने वेळोवेळी हुलकावणीच दिली. आमदार संग्राम जगताप महापौर असताना हाजी नजीर शेख उपमहापौर होते.तेही पुन्हा महापालिकेत आले नाहीत. महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात गीतांजली सुनील काळे उपमहापौर झाल्या. त्यानंतरच्या निवडणुकीत काळे यांचा पराभव झाला. आमदार संग्राम जगताप दुसऱ्यांदा महापौर झाले. त्यावेळी उपमहापौरपदी माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी सुवर्णा कोतकर यांची वर्णी लागली. त्यादेखील पुन्हा महापालिकेत आल्या नाहीत. महापौर सुरेखा कदम यांच्या कार्यकाळात श्रीपाद छिंदम उपमहापौर होता. छिंदम वादग्रस्त ठरल्याने त्याला राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सेनेचे नगरसेवक अनिल बोरुडे हे उपमहापौरपदी विराजमान झाले. परंतु, पुढच्याच निवडणूकीत बोरुडे यांचा प्रभाग महिला राखीव झाला. त्यांच्या पत्नी सध्या नगरसेविका आहेत.
.....
काँग्रेसला हवेय महापौरपद
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी आहे. नगरच्या महापौरपदाबाबत मुंबईत बैठक झाली. या बैठकीचे काँग्रेसला निमंत्रण नव्हते. काँग्रेसने महापौरपदावर दावा ठाेकला आहे.