अहमदनगर: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने निवड होत असलेल्या जिल्हाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी कोपरगावचे संदीप वर्पे, पाथर्डीचे प्रताप ढाकणे, जामखेडचे राजेंद्र कोठारी, कर्जतचे राजेंद्र फाळके आणि पारनेरचे युवा नेते सुजित झावरे यांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे़ त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या बुधवारी मुंबईत नगर जिल्हाध्यक्ष निवडीबाबत बैठक होत आहे. अहमदनगर जिल्हा वगळता अन्य काही जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्षांना पक्षाने मुदतवाढ दिली आहे. तशी घोषणाही मध्यंतरी मुंबईतून करण्यात आली आहे. त्यामध्ये नगरचा समावेश नव्हता़ तेव्हाच नगरच्या जिल्हाध्यक्ष बदलाचे संकेत मिळाले होते़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सध्या शेवगाव- पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्याकडे आहे. पण, घुले विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असणार आहेत. आगामी निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांना पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी पुढे आली होती. पक्षश्रेष्ठींनी त्यास संमती दिली़ या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या नवीन जिल्हाध्यक्षपदासाठी चाचपणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातून पाच जणांनी पक्षाकडे मागणी केली आहे़ त्यांना मुंबईच्या बैठकीसाठी हजर राहण्याचे निरोपही पक्षाने धाडले असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात भाजपाने शिरकाव केला आहे. जिल्ह्यात लोकसभेचे दोन, तर विधानसभेचे बारा मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या मागील निवडणुकीत भाजप-शिवसेनेने बाजी मारली. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. राष्ट्रवादीला तीन जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीने सेना-भाजपाला धूळ चारली़ जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत घुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली़ भाजपाने सत्तेच्या बळावर सहकारी संस्थांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला़ मात्र घुले यांनी त्याचा मुकाबला केला़ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घुले मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यात त्यांचा शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ सध्या भाजपाच्या ताब्यात आहे. या मतदारसंघातून विजयश्री खेचून आणण्याचे मोठे आव्हान घुले यांच्यासमोर आहे़ त्यामुळेच घुले यांना मतदारसंघात वेळ देता यावा, यासाठी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त केले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दक्षिणेतून सर्वाधिक इच्छुकजिल्हाध्यक्षपदासाठी उत्तरेतून एकमेव अर्ज प्राप्त झाला असून, दक्षिणेतून ढाकणे, कोठारी, फाळके आणि झावरेंचा अर्ज आहे.