अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीच्या महापालिका क्षेत्रातील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुद्धे व शिवसेनेचे अनिल शिंदे मताधिक्याने विजयी झाले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या एकूण पाच जागांसाठी निवडणूक होती. यापूर्वी महापालिकेतील एका जागेसह तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.
सर्वसाधारण गटातून अनिल शिंदे व येवले या दोघा शिवसेनेच्या नगरसेवकांतच लढत होती, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुद्धे व शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांच्यात लढत होती. या निवडणुकीत एकूण 67 नगरसेवकांना मतदानाचा हक्क होता. सर्व 67 मतदारांनी मतदान केले . दोन्ही ठिकाणी दोनच उमेदवार असल्याने पसंती क्रम पद्धतीनुसार पहिल्या पसंतीची मते ज्या उमेदवाराला अधिक मिळतील तो विजयी होणार होता.
गुरुवारी सकाळी येथील महासैनिक लॉन येथे झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीचे पाऊलबुद्धे यांना 48 तर शिवसेनेच्या जाधव यांना 15 मते मिळाली. येथील चार मते बाद झाली. दुसरीकडे शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत झालेल्या लढतीत शिंदे यांना तब्बल 52 मते, तर येवले यांना दहा मते मिळाली. येथे पाच मते बाद झाली.विनीत पाऊलबुद्धे यांना राष्ट्रवादीसह भाजप, इतर पक्ष तसेच शिवसेनेच्याही एका गटाने मदत केल्याचे दिसते आहे. दुसरीकडे शिवसेनेत उभी फूट पडल्याने येवले यांना फटका बसला. शिवसेनेचे शिंदे मात्र राष्ट्रवादी, भाजप व इतर नगरसेवकांच्या मदतीने सर्वाधिक मतांनी विजयी झाल्याचे निकालातून स्पष्ट होते.