श्रीगोंदा : तालुक्यातील टाकळी कडेवळीत, वडाळी परिसरातील जंगलाला आग लागली असून, त्यामध्ये वनसंपदा जळून खाक झाली. हा खोडसाळपणा अज्ञाताने केल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकाराबाबत वनविभाग मात्र अनभिज्ञ आहे. आगीमुळे जंगलात वास्तव्यास असलेले वन्यजीवही धोक्यात आले आहेत.
तालुक्यातील टाकळी कडेवळीत, तसेच श्रीगोंदा-वडाळी रस्त्यावरील परिसरात मोठ्या प्रमाणावर वनविभागाची जमीन असून, त्यावर वेगवेगळी झाडे आहेत, तसेच ससे, हरिण, तरस, दुर्मिळ पक्षी, वन्यजीवांचेही याच जंगलात वास्तव्य असते. आगीमुळे येथील वनसंपदेचे नुकसान तर झालेच वन्यजीवही धोक्यात आले आहेत.
याबाबत वन विभागाला माहिती देऊनही कोणताही कर्मचारी आग लागलेल्या ठिकाणी दाखल झाला नाही. टाकळी येथे लागलेली आग गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विझविण्याचा प्रयत्न केला. वडाळी रस्त्यावरील जंगलात लागलेली आग राष्ट्रवादीचे ऋषिकेश गायकवाड, संदीप वागस्कर, राजेंद्र राऊत, प्रमोद आहेर यांनी विझविली.
फोटो : ०७ श्रीगोंदा आग
श्रीगोंदा-वडाळी रस्त्यावरील जंगलाला लागलेली आग.